मुंबई : कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आयपीएल आणि टी-२० वर्ल्ड कपचं भवितव्य अजूनही अंधारात आहे. त्यातच आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या दौऱ्यामध्ये टीम इंडिया डे-नाईट टेस्ट मॅचदेखील खेळणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-२० सीरिज, टेस्ट सीरिज आणि मग वनडे सीरिज खेळवली जाईल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टी-२० सीरिज झाल्यानंतर टी-२० वर्ल्ड कप होईल, यानंतर टेस्ट सीरिज आणि मग वनडे सीरिज खेळवली जाईल. भारत ऑस्ट्रेलियामध्ये ३ टी-२०, ४ टेस्ट आणि ३ वनडे मॅचची सीरिज खेळेल.
ल्या ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमधली पहिली मॅच ३ डिसेंबरपासून ब्रिसबेनमध्ये सुरू होईल. तर दुसरी टेस्ट मॅच डे-नाईट असेल, ही टेस्ट ऍडलेडमध्ये ११ डिसेंबरला सुरू होणार आहे.
२६ डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे टेस्ट मॅच खेळवली जाईल, तर चौथी टेस्ट मॅच २ जानेवारी ते ७ जानेवारीदरम्यान सिडनीमध्ये होईल. या टेस्ट सीरिजआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ मॅचची टी-२० सीरिजही होणार आहे. ११ ऑक्टोबर, १४ ऑक्टोबर आणि १७ ऑक्टोबरला या टी-२० मॅच होतील. या टी-२० सीरिजनंतर ऑस्ट्रेलियामध्येच टी-२० वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं आहे, पण टी-२० वर्ल्ड कप होणार का नाही? याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे.
टी-२० वर्ल्ड कपनंतर भारतीय टीम ऑस्ट्रेलियामध्येच ३ वनडे मॅचची सीरिजही खेळेल. १२ जानेवारी, १५ जानेवारी आणि १७ जानेवारीला या ३ मॅच खेळवल्या जातील.
कोरोना व्हायरसच्या संकटामुळे वेळापत्रकात काही बदल होण्याची शक्यता आहे, पण सध्या तरी आम्ही हे वेळापत्रक निश्चित केलं आहे. जेवढं आंतरराष्ट्रीय क्रिकेट शक्य होईल, तेवढं आम्ही खेळू, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ केव्हिन रॉबर्ट्स म्हणाले. वेळापत्रकात काही बदल झाले तर ते कळवण्यात येतील, असंही त्यांनी सांगितलं.
११ ऑक्टोबर- पहिली टी-२०- गाबा, ब्रिस्बेन
१४ ऑक्टोबर- दुसरी टी-२०- मनुका ओव्हल, कॅनबेरा
१७ ऑक्टोबर- तिसरी टी-२०- ऍडलेड ओव्हल
३-७ डिसेंबर- पहिली टेस्ट- गाबा, ब्रिस्बेन
११-१५ डिसेंबर- दुसरी टेस्ट- ऍडलेड
२६-३० डिसेंबर- तिसरी टेस्ट- मेलबर्न
३-७ जानेवारी- चौथी टेस्ट- सिडनी
१२ जानेवारी- पहिली वनडे- पर्थ
१५ जानेवारी- दुसरी वनडे- मेलबर्न
१७ जानेवारी- तिसरी वनडे- सिडनी