BCCI Annual Contract List : 'या' दिग्गज खेळाडूंच्या कारकिर्दीला फूलस्टॉप? बीसीसीआयने दिले संकेत

बीसीसीआयने 2022-23 वर्षासाठी भारतीय क्रिकेटपटूंच्या कराराची यादी जाहीर केली आहे. या नव्या करारात काही खेळाडूंचं प्रमोशन झालं आहे तर काही खेळाडू यादीच्या बाहेर फेकले गेलेत. त्यामुळे या खेळाडूंच्या क्रिकेट कारकिर्दीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. 

Updated: Mar 27, 2023, 10:33 PM IST
BCCI Annual Contract List : 'या' दिग्गज खेळाडूंच्या कारकिर्दीला फूलस्टॉप? बीसीसीआयने दिले संकेत title=

BCCI Annual Contract List : भारतीय  क्रिकेट बोर्डाने (BCCI) वर्ष 2022-23 साठी टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंच्या वार्षिक कराराची यादी (Annual Contract List) जाहीर केली आहे. या यादीत एकुण 26 खेळाडूंना जागा मिळालीय. ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 पर्यंत या खेळाडूंबरोबर करार असणार आहे. यावेळी ग्रेड A+ मध्ये चार खेळाडू, ग्रेड A मध्ये पाच खेळाडू, ग्रेड B मध्ये सहा खेळाडू आणि ग्रेड C मध्ये 11 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. 

नव्या यादीनुसार काही खेळाडूंना बढती मिळाली आहे. तर काही खेळाडूंचं डिमोशन झालं आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) ग्रेड A+ मध्ये प्रमोशन देण्यात आलं आहे. जडेजाने नुकत्याच खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत दमदार कामगिरी केली होती. 2022 या वर्षातही जडेजाच्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केलं होतं. याउलट गेल्या काही सामन्यात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या केएल राहुल (KL Rahul) आणि शार्दुल ठाकूरला (Shardul Thackur) यावेळी धक्का बसला आहे.  

रहाणे, ईशांतची कारकिर्द संपली? 
खेळाडूंच्या करार यादीतून मुंबईकर अजिंक्य रहाणे (Ajinya Rahane) आणि वेगवान गोलंदाज ईशांत शर्माला (Ishant Sharma) बाहेर करण्यात आलं आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचे दरवाजे त्यांच्यासाठी जवळपास बंद झाल्याचं बोललं जात आहे. यादीतून वगळत बीसीसीआयने त्यांना एकप्रकारे तसे संकेतच दिले आहेत. 34 वर्षांचा ईशात शर्मा आपला शेवटचा सामना 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. तर 34 वर्षांचा अजिंक्य रहाणे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. 

याशिवाय भुवनेश्वर कुमार, हनुमा विहारी, दीपक चाहर आणि ऋद्धिमान साहा यांनाही बीसीसीआयच्या करार यादीत जागा मिळालेली नाही. 33 वर्षांच्या भुवनेश्वरला गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियात संधी देण्यात आली होती. यानंतरही त्याला यादीतून वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तर दीपक चाहर दुखापतीमुळे गेले काही काळ मैदानापासून दूर आहे. 

केएल राहुलला वॉर्निंग
टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुलला ग्रेड A मधून ग्रेड B मध्ये टाकण्यात आलं आहे. यामुळे बीसीसीआयने एकप्रकारे राहुलला वॉर्निंग दिल्याचं बोललं जात आहे. आगामी काळात केएल राहुलने चांगली कामगिरी केली नाही तर अजिंक्य रहाणे, ईशांत आणि भुवनेश्वर सारखं त्यालाही करारयादीतून बाहेर बसावं लागेल. 

बुमराह न खेळताही A+ मध्ये
भारताचा वेगवाग आणि हुकमी गोलंदाज जसप्रीत बुमराह ग्रेड A+ मध्ये आपली जागा टीकवून आहे. खरं तर बुमराह गेले अनेक महिने दुखापतीमुळे टीम इंडियापासून दूर आहे. त्याची दुखापत गंभीर असून येत्या काही महिन्यात त्याचं संघात पुनरागमन करणं जवळपास अशक्य आहे. असं असतानाही बुमराहला A+ मध्ये कायम ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दुखापतीग्रस्त दीपक चाहरला एक न्याय आणि जसप्रीत बुमराहसाठी वेगळा न्याय का असा सवाल क्रिकेट चाहते उपस्थित करत आहेत. 

हार्दिक-अक्षर आणि सूर्याची बल्ले-बल्ले
टी20 संघाचा कर्णधार आणि ऑलराऊंडर हार्दीक पांड्या, मिस्टर 360 अर्थात सूर्यकुमार यादव आणि ऑलराऊंडर अक्षर पटेल यांनाही प्रमोशन मिळालं आहे. या तीनही खेळाडूंनी गेल्या वर्षभरात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याचं फळ त्यांना मिळालंय. याशिवाय युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह, ईशान किशन आणि केएस भरतला पहिल्यांदाच या यादीत संधी मिळाली आहे. 

सेंट्रल कॉन्ट्रैक्ट प्लेयर्स (ऑक्टबर 2022 - सप्टेंबर 2023)

ग्रेड A+ (7 कोटी रुपये वार्षिक): विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा

ग्रेड A (5 करोड़ रुपये वार्षिक): हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल.

ग्रेड B (3 करोड़ रुपये वार्षिक): चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल.

ग्रेड C (1 करोड़ रुपये वार्षिक): उमेश यादव, शिखर धवन, शार्दुल ठाकुर, ईशान किशन, दीपक हुड्डा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, केएस भरत