Ind vs NZ 1st Test : श्रीलंकेविरुद्ध 0-2 ने हरणाऱ्या न्यूझीलंड क्रिकेट संघाने टीम इंडियाला पहिल्याच कसोटी सामन्यात मोठा धक्का दिला. बंगळुरु कसोटीच्या (Bengluru Test) दुसऱ्या दिवशी कागदावर मजबूत वाटणारी टीम इंडियाची (Team India) फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर टीम इंडियाचा संपूर्ण संघ अवघ्या 46 धावात गारद झाला. केवळ दोन फलंदाज धावांचा दुहेरी आकडा गाठू शकले. तर अर्धा संघ भोपळाही फोडू शकले नाहीत. विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, रवींद्र जडेजा आणि आर अश्विन शुन्यावर बाद झाले. 20 धावा करणारा ऋषभ पंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
रोहित आणि विराट सोशल मिडयावर ट्रोल
पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचे स्टार फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) सपशेल फ्लॉप ठरले. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण रोहितचा हा निर्णय सपशेल चुकीचा ठरला. किवी गोलंदाजांनी टीम इंडियाच्या फलंदाजांची पळता भूई थोडी केली. रोहित शर्मा अवघ्या दोन धावांवर बाद झाला. तर विराट कोहली भोपळाही फोडू शकला नाही. या कामगिरीनंतर रोहित आणि विराट सोशल मीडियावर युजर्सच्या निशाण्यावर आले आहेत.
युजर्सने रोहित आणि विराटला जोरदार ट्रोल केलं आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीने रोहित शर्माला क्लिन बोल्ड केलं. रोहितने 16 चेंडूत केवळ 2 धावा केल्या. यानंतर विल्यम ओ'रुरकेने विराटा कोहलीला ग्लेन फिलिप्सच्या हातात कॅच द्यायला भाग पाडलं. विराट मैदानावर केवळ हजेरी लावून गेला. बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतही विराट कोहली सपशेल फ्लॉप ठरला होता. दोन सामन्यांच्या चार डावात त्याला केवळ 99 धावा केल्या होत्या.
रोहित आणि विराटच्या या निराशाजनक कामगिरीनंतर क्रिकेट चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या फ्लॉप कामगिरीनंतर आता कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्त व्हा अशी टीका होऊ लागली आहे. सोशल मीडियावर रोहित आणि विराटविरुद्ध कॅम्पेनच सुरु करण्यात आलं आहे.
रोहित शर्मा कसोटीतून निवृत्त होणार?
2025 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळवली जाणार आहे. टीम इंडियाचं अंतिम फेरीचं तिकिट जवळपास निश्चित मानलं जात आहे. अशात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर रोहित शर्मा निवत्ती जाहीर करु शकतो अशी चर्चा रंगली आहे. रोहित शर्माचं वाढतं वय लक्षात घेता रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होऊ शकतो. कारण एकदिवसीय क्रिकेटसाठी त्याला फिट राहावं लागेल. रोहित शर्मा 2027 चा एकदिवसीय वर्ल्ड कप खेळेल अशी चर्चा रंगली आहे.