भारत-श्रीलंका क्रिकेट मालिकेत मोठा बदल, बीससीआयने जारी केलं नवं वेळापत्रक... पाहा कधी होणार सामने?

IND vs Sri Lanka Revised Schedule : भारत-झिम्बाब्वे टी20 मालिकेनंतर टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावल जाणार आहे. या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं. पण आता या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. 

राजीव कासले | Updated: Jul 13, 2024, 08:27 PM IST
भारत-श्रीलंका क्रिकेट मालिकेत मोठा बदल, बीससीआयने जारी केलं नवं वेळापत्रक... पाहा कधी होणार सामने? title=

IND vs Sri Lanka Revised Schedule : भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वेच्या (India vs Zimbabwe) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि झिम्बाब्वेदरम्यान पाच टी20 सामन्यांची मालिका खेळवली जात असून यातले चार सामने झालेत. यात टीम इंडियाने (Team India) 3 सामने जिंकत मालिकाही खिशात घातली आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया श्रीलंकेच्या (Team India Tour of Sri Lanka) दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याचं वेळापत्रक बीसीसीआयने दोन दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं. पण आता श्रीलंका दौऱ्याच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. बीसीसीआयने सोशल मीडिया एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत नव्या वेळापत्रकाची माहिती दिली आहे. (ind vs sri lanka revised schedule)

भारत-श्रीलंका दौऱ्यात बदल
भारत आणि श्रीलंकादरम्यान तीन टी20 आणि तीन एकिदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार मालिकेतील सामने एक दिवसाने पुढे ढकलण्यात आले आहेत. आधीच्या कार्यक्रमानुसार टी20 मालिकेची सुरुवात 26 जुलैपासून होणार होती. पहिला सामना 26 जुलै, दुसरा सामना 27 जुलै आणि तिसरा टी20 सामना 29 जुलैला खेळवला जाणार होता. पण आता नव्या वेळापत्रकानुसार पहिला टी20 सामना 27 जुलै, दुसरा टी20 सामना 28 जुलै आणि तिसरा सामना 30 जुलैला रंगणार आहे. 

याप्रमाणे एकदिवसीय मालिकेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. पहिला एकदिवसीय सामना एकदिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. याआधी पहिला एकदिवसीय सामना 1 ऑगस्टला रंगणार होता. तो आता ऑगस्टला खेळवला जाणार आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या वेळेत कोणातही बदल करण्यात आलेला नाही.

सीनिअर खेळाडूंना विश्रांती
श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियातल्या सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आधीच निवृत्ती जाहीर केली आहे. रोहित शर्माच्या गैरहजेरीत श्रीलंका दौऱ्या हार्दिक पांड्या किंवा ऋषभ पंतकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. 

प्रशिक्षक म्हणून पहिली परीक्षा
टीम इंडियासाठी श्रीलंका दौरा आणखी एका कारणासाठी महत्त्वाचा असणार आहे. गौतम गंभीरचा प्रमुख प्रशिक्षक म्हणून हा पहिला दौरा असणार आहे. 9 जुलैला टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीर याची नियुक्ती केली. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करत गौतम गंभीरच्या नावाची घोषणा केली होती. 

भारताचा श्रीलंका दौरा (IND vs Sri Lanka Revised Schedule)
27 जुलै – पहिला टी-ट्वेंटी सामना, पल्लेकेले
28 जुलै – दुसरा टी-ट्वेंटी सामना, पल्लेकेले
30 जुलै – तिसरा टी-ट्वेंटी सामना, पल्लेकेले
2 ऑगस्ट – पहिली वनडे, कोलंबो
4 ऑगस्ट – दुसरी वनडे, कोलंबो
7 ऑगस्ट – तिसरी वनडे, कोलंबो

भारतीयी वेळेनुसार कधी सामने
भारत आणि श्रीलंकादरम्यानचे टी20 सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. तर एकदिवसीय सामन्यांची सुरुवात भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता होणार आहे.