Hyderabad Cricket Team :देशांतर्गत क्रिकेमध्ये सध्या रणजी ट्ऱॉफी (Ranji Trophy) स्पर्धेचा हंगाम सुरु आहे. या हंगामात प्लेट ग्रुपमध्ये हैदराबाद संघाने (Hyderabad Cricket Team) दमदार कामगिरी केली आहे. हैदराबाद संघाने अंतिम सामन्यात मेघालयचा पराभव करून प्लेट गटात (Plate Group) विजय मिळवलाय. या विजयानंतर हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन मोहन राव अरिशनपल्ली (HCA president A. Jagan Mohan Rao) यांनी हैदराबादचा संघासाठी पुढील तीन मोसमात रणजी एलिट ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाल्यास मोठं बक्षीस जाहीर केलं आहे. अध्यक्ष जगन मोहन राव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.
हैदराबाद क्रिकेट अध्यक्षांची घोषणा
हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे (HCA) अध्यक्ष जगन मोहन राव अरिश्नपल्ली यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी म्हटलंय 'प्रत्येक खेळाडूला बीएमडब्ल्यू कार आणि संघाला 1 कोटी रुपये रोख' पुढच्या तीन वर्षात रणजी एलीट ट्रॉफी जिंकल्यास हैदराबाद क्रिकेट संघाला हे बक्षीस दिलं जाईल'. जगन मोहन राव यांनी आपली पोस्ट बीसीसीआय, हैदराबाद क्रिकेट असोसिएशन, महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या सहित अनेक दिग्गजांना टॅग केली आहे.
प्लेट ग्रुप जिंकल्यामुळे बक्षीस
इतकच नाही तर हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन मोहन राव अरिशनपल्ली यांनी प्लेट ग्रुप जिंकल्याने संघाला 10 लाख रुपयांचं रोख बक्षीस देऊ केलं आहे. याशिवाय संघासाठी चांगली कामगिरी करणारे कर्णधार तिलक वर्मा, तन्मय अग्रवाल, तनय त्यागराज, नितीश रेड्डी आणि प्रग्नय रेड्डी यांना 50,000 हजार रुपये रोख जाहीर केले आहेत. प्लेट ग्रुप जिंकल्यामुळे हैदराबाद क्रिकेट संघ पुढच्या हंगामात 'रणजी ट्रॉफी एलीट ग्रुप सी'मध्ये खेळताना दिसणार आहे.
प्लेट आणि एलीट ग्रुप म्हणजे काय?
रणजी ट्रॉफी स्पर्धा दोन फॉर्मेटमध्ये खेळवली जाते. यातला एक असतो एलीट ग्रुप (Ranji Elite Group) आणि दुसरा असोत प्लेट ग्रुप. प्लेट ग्रुप जिंकणारा संघ पुढच्या हंगामात एलीट ग्रुप खेळण्यासाठी पात्र ठरतो. तर एलीट ग्रुपमध्ये वाईट कामगिरी करणारा संघ प्लेट ग्रुपमध्ये ढकलला जातो. प्लेट ग्रुपमध्ये 6 संघ खेळतात. तर एलीट ग्रुपमध्ये 32 संघांचा समावेश असतो. यात एलीट ग्रुप ए, एलीट ग्रुप बी, एलीट ग्रुप सी, एलीट ग्रुप डी असे चार ग्रुप असतात. प्रत्येक ग्रुपमध्ये 8 संघ असतात. प्रत्येक ग्रुपमधील टॉपचे दोन संघ क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरतात.