India vs Afghanistan 3rd T20 : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान बुधवारी टी20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बंगळुरुमध्ये (Bangluru) खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकत 3-0 अशी मालिका जिंकण्यासाठी टीम इडिया (Team India) सज्ज झालीय. पण त्याचबरोबर क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे ते विराट कोहलीच्या (Virat Kohli) कामगिरीवर. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 सामन्यात विराट कोहलीला विश्वविक्रम रचण्याची संधी आहे. या सामन्यात विराट कोहलीने 6 धावा केल्यास टी20 क्रिकेट प्रकारात 12 हजार धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर होणार आहे. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावाा करण्याचा विक्रम वेस्टइंडिजचा महान फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे.
विराट कोहलीला विक्रमाची संधी
टी20 क्रिकेटमध्ये विराट कोहली आतापर्यंत 375 सामने खेळला आहे. यात विराटच्या नावावर तब्बल 11994 जमा आहेत. 375 सामन्यात विराटने 8 शतकं आणि 91 अर्धशतकं झळकावली आहेत. 6 धावा केल्यास विराट कोहलीच्या खात्यात 12 हजार धावा जमा होतील. याशिवाय टी20 क्रिकेटमध्ये वेगवान 12 हजार धावा बनवण्याच्या विक्रमही त्याच्या नावावर जमा होील. टी20 क्रिकेमटध्ये विराट कोहलीची सर्वोत्तम धावसंख्या 122 आहे.
टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. ख्रिस गेलने (Chris Gayle) 463 सामन्यात तब्बल 14562 धावा केल्या आहेत. यात त्याने 22 शतकं आणि 88 अर्धशतकं झळकावली आहेत. ख्रिस गेलची सर्वोत्तम धावसंख्या 175 आहे. आयपीएलमधेय ख्रिस गेलने 175 धावांची तुफान खेळी केली होती.
टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये पाकिस्तानचा शोएब मलिक दुसऱ्या क्रमांकावर आहे. शोएब मलिकने 525 धावात 12993 धावा केल्या आहेत. यात त्याने 82 अर्धशतकं झळकावलीत. पण टी20 क्रिकेटमध्ये शोएबला एकही शतक झळकावता आलेलं नाही. 95 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. तर वेस्टइंडिजचा आक्रमक फलंदाज कायरन पोलार्ड या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोली या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
भारत-अफगाणिस्तान तिसरा सामना
भारत आणि अफगाणिस्ताानदरम्यान बंगळुरुत तिसरा टी20 सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. या सामन्यासाठी बेंचवर बसलेल्या खेळाडूंना संधी दिली जाईल. पहिल्या दोन सामन्यात संजू सॅमसनला संधी देण्यात आली नव्हती. त्याच्या जागी विकेटकिपर-फलंदाज जितेश शर्माला खेळवण्यात आलं होतं. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात संजू सॅमसनला संधी मिळण्याची शक्यता आहे.