निवृत्तीनंतर अवघ्या 48 तासात शिखर धवनचं क्रिकेटमध्ये कमबॅक, 'या' स्पर्धेसाठी सज्ज

Shikhar Dhawan : टीम इंडियाचा गब्बर अर्थात शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. पण निवृत्तीच्या अवघ्या 48 तासात शिखर धवनने मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यात शिखर पु्न्हा अॅक्शनमध्ये दिसणार आहे. 

राजीव कासले | Updated: Aug 27, 2024, 07:47 PM IST
निवृत्तीनंतर अवघ्या 48 तासात शिखर धवनचं क्रिकेटमध्ये कमबॅक, 'या' स्पर्धेसाठी सज्ज title=

Shikhar Dhawan : 22 ऑगस्टची सकाळ क्रिकेट चाहत्यांसाठी धक्का देणारी ठरली. टीम इंडियाचा गब्बर अर्थात शिखर धवनने (Shikhar Dhawan) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपल्या निवृत्तीची घोषणा केली. गेला बराच काळ टीम इंडियातून (Team India) बाहेर असलेल्या शिखरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (Retirement) घेतली. शिखर टीम इंडियासाठी शेवटचा कसोटी सामना 2018 मध्ये खेळला होता. तर शेवटचा टी20 सामना 2021 मध्ये आणि शेवटचा एकदिवसीय सामना 2022 मध्ये खेळला होता. म्हणजे जवळपास दोन ते तीन वर्षांपासून शिखर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. शिखर धवनने सोशल मीडियावर निवृत्ती जाहीर करताच अनेक कमेंट यायला सुरुवात झाली. 

या दिग्गजांची प्रतिक्रिया
सोशल मीडियावर सामान्य क्रिकेट चाहत्यांबरोबरच टीम इंडियातल्या अनेक दिग्गजांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, युवराज सिंग या सर्वांनी शिखर धवनबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला. आयुष्याच्या दुसऱ्या इनिंगसाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या. पण या सर्व प्रतिक्रियांमध्ये सर्वात खास ठरली ती युवराज सिंहची प्रतिक्रिया. युवराजने शिखरला केवळ शुभेच्छाच दिल्या नाहीत तर नव्या इनिंगसाठी निमंत्रणही दिलं. 

नव्या इनिंगसाठी निमंत्रण
युवराज सिंगने आपल्या पोस्टमध्ये शिखर धवनबरोबरच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. 'ड्रेसिंग रुम शेअर करणं आपल्यासाठी खास होत्या. आयसीसी स्पर्धेत खेळण्याचा तुझा अंदा खऱ्या अर्थाने तुला गब्बर बनवतो' असं म्हटलं आहे. त्याचबरोबर युवराजने शिखरला लीजेंज लीगमध्ये खेळण्याचं निमंत्रण दिलं आहे. 

48 तासात कमबॅक
युवराज सिंगने निमंत्रण दिल्यानंतर 24 तासातच लीजेंड लीग क्रिकेटने (Legend League Cricket) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शिखर धवनच्या सेकंड इनिंगची घोषणा केली. लीजेंड लीगने पोस्ट शेअर करत म्हटलंय 'सो जाओ नहीं तो गब्बर आ जाएगा, पहिल्यांदा हे वाक्य सत्यात उतरत आहे' या गोष्टीची घोषणा करताना अभिमान वाटतोय, शिखर धवन अधिकृतरित्या लीजेंड लीग क्रिकेटशी जोडला जात आहे'

सप्टेंबरमध्ये लीजेंड लीग खेळवली जाणार असून यात शिखर धवन चौकार-षटकारांची बरसात करताना दिसणार आहे. 

शिखरची क्रिकेट कारकिर्द
शिखर धवन टीम इंडियासाठी 34 कसोटी सामने खेळला असून त्यात त्याने 2315 धावा केल्या आहेत. यात 7 शतकं आणि 5 अर्धशतकं ठोकली असून 190 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. तर 167 एकदिवसीय सामन्यात शिखरच्या नावावर 6793  जमा आहेत. यात तब्बल 17 शतकं आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे. धवनने 11 शतकांसह 68 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात  1759 धावा केल्या आहेत. भारताचा हुकमी सलामीवीर अशी शिखर धवनची ओळख होती.