निवृत्ती घेतलेला दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात, टी20 लीगमध्ये 'रॉयल्स' संघाकडून खेळणार

Dinesh Kartik : आयपीएलमध्ये बराच काळ खेळणाऱ्या 39 वर्षीय दिनेश कार्तिकने जून महिन्यात क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. पण आता दिनेश कार्तिक पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. 

राजीव कासले | Updated: Aug 6, 2024, 03:45 PM IST
निवृत्ती घेतलेला दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात, टी20 लीगमध्ये 'रॉयल्स' संघाकडून खेळणार title=

Dinesh Kartik : आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणाऱ्या  39 वर्षीय दिनेश कार्तिकने (Dinesh Kartik) जून महिन्यात क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. पण आता दिनेश कार्तिक पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. टीम इंडियाचा माजी विकेटकिपर आणि फलंदाज दिनेश कार्तिक पार्ल रॉयल्स संघाकडून एसए20 लीगमध्ये  (SA20 League) खेळताना दिसणार आहे. पुढच्या वर्षी 9 जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेत ही टी20 लीग खेळवली जाणार आहे. या लीगमध्ये खेळणार दिनेश कार्तिक हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. 

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणाऱ्या दिनेश कार्तिकने निवृत्तीनंतर आरसीबीने (RCB) त्याला फलंदाज प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं आहे.  एसए20 लीगमध्ये पार्ल रॉयल्स (Paarl Royals) संघाबरोबर करार केल्यानंतर दिनेश कार्तिकिने ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं सांगितलं. दक्षिण आफ्रिकेत खेळण्याच्या आपल्या खूप चांगल्या आठवणी आहेत, त्यामुळे जेव्हा मला विचारण्यात आलं त्यावेळी मी नकार देऊ शकलो नाही, क्रिकेटच्या मैदानात परत उतरणं आणि पार्ल रॉयल्स सारख्या संघाकडून खेळण्याची संधी मिळणं हे आपल्यासाठी खास असल्याचं कार्तिकने म्हटंलय. 

आयपीएलच्या धर्तीवर दक्षिण आफ्रिकेत जानेवारी 2023 पासून टी20 लीग सुरु झाली. आयपीएलमधल्याच सर्व संघ मालकांनी दक्षिण आफ्रिका लीगमधले संघ विकत घेतले आहेत. राजस्थान रॉयल्सकडून (RR) पार्ल रॉयल्स संघ खरेदी करण्यात आला आहे. SA20 मध्ये सहा संघ आहेत. यात  MI केप टाउन, जोबर्ग सुपर किंग्स, डरबन सुपर जायंट्स, पार्ल रॉयल्स, प्रिटोरिया कॅपिटल्स आणि सनराइजर्स ईस्टर्न केप या संघांचा समावेश आहे. 

आयपीएलमध्ये दमदार कामगिरी
आयपीएलच्या सतराव्या हंगामात आरसीबीकडून खेळताना दिनेश कार्तिकने 14 सामन्यात 187.36 च्या स्ट्राइक रेटने 326 धावा केल्यात. टीम इंडियासाठी कार्तिक 2022 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. ऑस्ट्रेलियात झालेल्या टी20 वर्ल्ड कपदरम्यान बांगलादेशविरुद्धचा हा सामना होता. 
 
कार्तिकची क्रिकेट कारकिर्द
दिनेश कार्तिक भारतासाठी 26 कसोटी सामने खेळला असून यात त्याने 1025 धावा केल्या आहेत. एक शतक आणि 7 अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत. तर 94 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात कार्तिकने 1752 धावा केल्यात. यात त्याच्या नावावर नऊ अर्धशतकं जमा आहेत. कार्तिक भारतासाठी आतापर्यंत 60 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळला असून यात त्याने 686 धावा केल्या आहेत.