Paris Olympics 2024: 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राची फायनलमध्ये एन्ट्री, पहिल्याच फेरीत आश्चर्यजनक कामगिरी

Neeraj Chopra Qualified for Finals : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पहिल्याच फेरीमध्ये 89.34 मीटर भाला फेकून फायनलमध्ये धडाक्यात एन्ट्री मारली आहे.

सौरभ तळेकर | Updated: Aug 6, 2024, 04:03 PM IST
Paris Olympics 2024: 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राची फायनलमध्ये एन्ट्री, पहिल्याच फेरीत आश्चर्यजनक कामगिरी title=
Neeraj Chopra into the finals

Neeraj Chopra into the finals : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदरी एकही सुवर्ण पदक आलं नाही. सर्वांना अपेक्षा आहेत गोल्डन बॉय नीरज चोप्रा याच्याकडून... अशातच पात्रता फेरीमध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने 89.34 मीटर लांब भाला फेकून फायनलमध्ये धडाक्यात एन्ट्री मारली आहे. नीरज चोप्रा याने फेकलेला भाला सर्वात अव्वल ठरला. नीरजच्या पुढे कुणालाही भाला फेकता आला नाही. पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम याने 86.59 मीटर भाला फेकून क्वालिफाय केलं. 

नीरज चोप्राने 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक्समध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकलं होतं. त्या विजयानंतर आज नीरज पुन्हा ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. नेहमीप्रमाणे नीरजने आजही भारतीयांना निराश केलं नाही. नीरजने 89.34 मीटर लांब भाला फेकला अन् पहिल्याच प्रयत्नात यश गाठलं. आता नीरजला आणखी मजबूत फायनलमध्ये करावी लागणार आहे. नीरजची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी 89.94 मीटरपर्यंत दूर भाला फेकण्याची आहे. त्यामुळे आता फायनलमध्ये नीरज किती लांब भाला फेकणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.

नीरजने यंदाच्या वर्षभरामध्ये केवळ 3 स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला आहे. नीरजने एप्रिल महिन्यामध्ये दोहा डायमंड लीगमध्ये 88.36 मीटरपर्यंत दूर भाला फेकला होता. ही त्याची यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम कामगिरी आहे. नीरजने पावो नुरमी गेम्समध्ये 85.97 मीटर दूरवर भाला फेकत पहिलं स्थान पटकावलं होतं. त्यानंतर तो 60 टक्के तंदुरुस्त असतानाही फेड्रेशन कप स्पर्धेत सहभागी झाला. या स्पर्धेत त्याने 82.27 मीटर दूर भाला फेकला.

फायनल सामना कधी?

दरम्यान, फायनलमध्ये नीरज चोप्राचा मुकाबला पाकिस्तानच्या अर्शद नदीम याच्यासोबत असणार आहे. तर ग्रेनेडियन भालाफेकपटू अँडरसन पीटर्स देखील तोडीसतोड खेळाडू ठरू शकतो. अँडरसन पीटर्सने 88.63 मीटर लांब भाला फेकला. आता येत्या 8 तारखेला फायनल सामना खेळवला जाईल. 8 ऑगस्टला रात्री 11.55 वाजता अंतिम सामना खेळवला जाईल.