मुंबई : इंग्लंडमध्ये २०१९ साली होणाऱ्या वर्ल्ड कपआधी भारतीय टीमनं बीसीसीआयकडे वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत. यामध्ये परदेश दौऱ्यामध्ये पत्नी किंवा गर्लफ्रेंडला खेळाडूसोबत नेण्याची परवानगी द्यावी ही मागणी आधीच करण्यात आली होती. या मागणीवर बीसीसीआयनं अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. आता भारतीय खेळाडूंनी यामध्ये २ नव्या मागण्यांची भर टाकली आहे. २०१९ वर्ल्ड कपवेळी प्रवास करताना ट्रेनचा संपूर्ण डबा आरक्षित करुन द्यावा आणि खेळाडूंना केळी देण्यात यावीत, अशी मागणी भारतीय टीमनं केली आहे.
इंग्लंड दौऱ्यामध्ये इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून भारतीय क्रिकेटपटूंना आवडीची फळे देण्यात आली नव्हती. याची तक्रारही खेळाडूंनी बीसीसीआयकडे केली आहे. त्यामुळे पुढच्यावेळी बीसीसीआयनं स्वत:च्या खर्चानं खेळाडूंना केळी द्यावीत, अशी मागणी खेळाडूंनी केली आहे.
खेळाडू ज्या हॉटेलमध्ये राहतात त्या हॉटेलमध्ये अद्ययावत सुविधा असलेली जीम असावी. खेळाडू हॉटेलमध्ये किती दिवस राहणार आहेत, खेळाडू पत्नीसोबत असतील तर हॉटेलमधल्या कर्मचाऱ्यांना कसं वागावं हे सांगण्यात यावं, असं विराटनं खेळाडूंच्यामार्फत बीसीसीआयला सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीमला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना बसनेच प्रवास करावा लागतो. पण ट्रेननं प्रवास केला तर वेळ वाचेल, असं कोहलीनं बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीला सांगितलं आहे. इंग्लंडची टीमही त्यांच्या देशात ट्रेननं प्रवास करते, असं विराटनं समितीला सांगितलं.