CWG 2022: क्रिकेट स्पर्धेत भारतानं पाकिस्तानला नमवलं, 8 गडी राखून दिली मात

कॉमनवेल्थ 2022 स्पर्धेत भारतानं पाकिस्तानला धुळ चारली

Updated: Jul 31, 2022, 07:28 PM IST
CWG 2022: क्रिकेट स्पर्धेत भारतानं पाकिस्तानला नमवलं, 8 गडी राखून दिली मात title=
फोटो सौजन्य- BCCI Twitter

India Vs Pakistan Women Cricket: कॉमनवेल्थ स्पर्धेतील क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं पाकिस्तानचा 8 राखून पराभव केला. या विजयासह भारतीय महिला संघाने आगेकूच सुरु केली आहे. स्मृती मंधना हिने नाबाद 63 धावांची खेळी केली. पाकिस्ताननं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि सर्वबाद 99 धावा केल्या. तसेच भारतासमोर विजयासाठी 100 धावांचं आव्हान दिलं. भारताने 2 गडी गमवून 11.4 षटकात 102 धावा केल्या. 

पाकिस्तानचा डाव
पाकिस्ताननं नाणेफेक जिंकल्यानंतर मुनिब अली आणि इराम जावेद ही जोडी मैदानात उतरली. मात्र दुसऱ्या षटकातच पाकिस्तानला पहिला धक्का बसला. मेघना सिंगच्या गोलंदाजीवर इराम बाद झाली. तिला आपलं खातंही खोलता आलं नाही. यास्तिका भाटियाने तिचा झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर मुनिब आणि बिस्माह या जोडीने मैदानावर तग धरला. मात्र ही जोडी फोडण्यात स्नेह राणाला यश आलं. तिच्या गोलंदाजीवर बिस्माह पायचीत झाली. तिने 19 चेंडूत 17 धावा केल्या. त्यानंतर एका पाठोपाठ एक करत खेळाडू तंबूत परतत राहीले. मुनिब अली 32, अयेशा नसीम 10, ओमैमा सोहेल 10, अलिया रियाझ 18, फातिमा साना 8, कैनात इम्तियाज 2, डायना बैग 0, तुबा हस्सन 1 धावा करून बाद झाले. भारताकडून स्नेह राणा आणि राधा यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर रेणुका सिंग, मेघना सिंग आणि शफाली वर्माने प्रत्येकी एक गडी बाद केला. 

भारताचा डाव
पाकिस्ताननं विजयासाठी दिलेल्या 100 धावांचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना जोडी मैदानात उतरली. या जोडीनं पहिल्या गड्यासाठी 61 धावांची भागीदारी केली. ही जोडी फोडण्यात तुबा हस्सन हिला यश आलं. मुनिबा हसननं झेल घेत तिला तंबूचा रस्ता दाखवला. तिने 9 चेंडूत 16 धावांची खेळी केली. यात दोन चौकार आणि एका षटकाराचा समावेश. त्यानंतर संघाच्या 94 धावा असताना सब्भीनेनी मेघना 14 धावा करून बाद झाली. स्मृती मंधाना 63 धावा आणि जेमिमाह रॉड्रिग्स 2 या धावांवर नाबाद राहिले. 

पाकिस्तानचा संघ
मुनिब अली, इराम जावेद, बिस्माह मरूफ, ओमैमा सोहेल, आयेशा नसीम, अलीया रियाज, फातिमा साना, कैनात इम्तियाज, डायना बैग, तुबा हस्सन, एनाम अमिन

भारताचा संघ
शफाली वर्मा, स्मृती मंधाना, सब्भीनेनी मेघना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर, यस्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, राधा यादव, स्नेह राणा, मेघना, रेणुका सिंग