'जय श्रीराम' म्हणत पाकिस्तानच्या या माजी क्रिकेटपटूने म्हटलं ऐतिहासिक दिवस

 रामजन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न, पाकिस्तानातून आली ही प्रतिक्रिया

Updated: Aug 6, 2020, 10:19 AM IST
'जय श्रीराम' म्हणत पाकिस्तानच्या या माजी क्रिकेटपटूने म्हटलं ऐतिहासिक दिवस

नवी दिल्ली : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 5 ऑगस्टला अयोध्या रामजन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते संपन्न झाला. यानिमित्ताने देशात उत्साहाचं वातावरण होतं. कुठेतरी लाडू वाटून तर कुठे दिवे पेटवून हा उत्सव साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक घटनेनंतर पाकिस्तानातून देखील प्रतिक्रिया आली.

पाकिस्तानचा माजी लेगस्पिनर दानिश कनरिया याने राम मंदिराचं भूमीपूजन जगातील हिंदूंसाठी ऐतिहासिक दिवस असल्याचं म्हटलं आहे. दानिश कनेरिया याने ट्विट करत म्हटलं की, 'जगभरातील हिंदूंसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. भगवान राम हे आपले आदर्श आहेत. आम्ही सुरक्षित आहोत आणि कोणालाही आपल्या धार्मिक श्रद्धेने अडचण येऊ नये. भगवान श्री राम यांचे जीवन आपल्याला ऐक्य आणि बंधुता शिकवते. जय श्री राम.'

जय श्री राम म्हणत माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू म्हणाला की, 'भगवान राम यांचे सौंदर्य त्यांच्या नावात नाही तर त्याच्या चरित्रात आहे. भगवान श्रीराम हे विजयाचे प्रतिक आहेत. आज जगभरात आनंदाची लाट आहे. हा मोठा समाधानाचा क्षण आहे.'

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दानेश कनेरिया अचानक चर्चेत आला होता, तेव्हा पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने दावा केला होता की, 'काही पाकिस्तानी क्रिकेटपटूही कनेरिया हिंदू असल्याने त्याच्यासोबत जेवायला तयार नसायचे. मात्र नंतर अख्तर याने स्पष्टीकरण दिले की कनेरियासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आला.'