दीपिका पदुकोणच्या वडिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, रुग्णालयात दाखल

प्रकाश पदुकोण यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

Updated: May 4, 2021, 03:03 PM IST
दीपिका पदुकोणच्या वडिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, रुग्णालयात दाखल title=

मुंबई: देशात कोरोनाचं थैमान सुरू आहे. IPLमध्ये देखील कोरोना घुसल्यामुळे सध्या सामने स्थगित करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणचे वडील आणि स्टार बॅटमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांना कोरोना झाला आहे. 

प्रकाश पदुकोण यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रकाश पदुकोण हे 1980 मध्ये बॅटमिंटन इंग्लंड चॅम्पियनशिप जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू आहेत. त्यांचं आता वय 65 वर्ष आहे. त्यांची पत्नी आणि दुसऱ्या मुलीला कोरोनाची सौम्य लक्षणं दिसल्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली. प्रकाश पदुकोण त्यांची पत्नी आणि त्यांच्या एका मुलीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

प्रकाश पदुकोण यांना 2-3 दिवसांमध्ये रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे. तर दीपिकाच्या सर्व चाहत्यांनी आणि क्रीडा प्रेमींनी ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे. 

1970-80च्या काळात प्रकाश पदुकोण अनेकांचे रोलमॉडेल देखील होते. त्यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये देखील आपला ठसा उमटवला आहे. त्यांची कारकीर्द मोठी आहे. ते लवकर कोरोनातून बरे व्हावेत आणि सुखरूप घरी यावेत यासाठी सर्व स्तरातून प्रार्थना केली जात आहे. 

कोरोनाचा शिरकाव IPLमध्ये झाल्यामुळे सामने स्थगित करण्यात आले आहेत. तर BCCIने तातडीची बैठक बोलवली असून हे सामने कधी घेतले जाणार आणि उर्वरित निर्णय घेण्यासाठी ही बैठक आहे. तर सर्व संघांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.