लंडन : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८६ रननी पराभव झाला. या मॅचमध्ये महेंद्रसिंग धोनीनं वनडे क्रिकेटमध्ये १० हजार रनचा टप्पा गाठला. हे रेकॉर्ड करणारा धोनी चौथा भारतीय आहे. याआधी द्रविड, गांगुली आणि सचिनच्या नावावर हे रेकॉर्ड आहे. धोनीनं हा विक्रम केला असला तरी त्याला प्रेक्षकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. धोनीच्या या खेळीमुळे प्रेक्षकांमधून धोनीला चिडवण्यात आलं. या मॅचमध्ये धोनीनं ५९ बॉलमध्ये ३७ रनची खेळी केली. या धीम्या खेळीमुळे स्टेडियममधल्या प्रेक्षकांनी धोनीला चिडवलं. इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेननं धोनीच्या या खेळीवर प्रश्न उपस्थित केले होते.
धोनीसोबत झालेल्या या वर्तणुकीनंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीनं नाराजी व्यक्त केली आहे. लोकं एवढ्या लवकर निष्कर्षापर्यंत पोहोचतात हे दुर्भाग्यपूर्ण आहे. जेव्हा धोनी चांगलं खेळतो तेव्हा तो सर्वोत्तम फिनिशर असतो पण जेव्हा गोष्टी हव्या तश्या होत नाहीत तेव्हा त्याच्यावर टीका होते. धोनीकडे अनुभव आहे पण प्रत्येकवेळी तुम्हाला हव्या तसंच होत नाही. आम्हाला धोनीवर आणि त्याच्या क्षमतेवर पूर्णपणे विश्वास आहे, असं कोहली म्हणालाय.
मागच्या वर्षीही धोनीच्या कामगिरीवर अशाच प्रकारे टीका करण्यात आली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२०नंतरही धोनीवर निशाणा साधण्यात आला होता.
न्यूझीलंडविरुद्धच्या खराब कामगिरीनंतर लक्ष्मण आणि आगरकरनं धोनीला टी-२० क्रिकेटमधून निवृत्त व्हायचा सल्ला दिला होता. त्यावेळीही विराट कोहली आणि रवी शास्त्रीनं धोनीचा बचाव केला होता.