close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अंपायरकडून बॉल घेतल्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताला १-२ने पराभव सहन करावा लागला.

Updated: Jul 18, 2018, 09:36 PM IST
अंपायरकडून बॉल घेतल्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा

लीड्स : इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताला १-२ने पराभव सहन करावा लागला. या मालिकेनंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आलंय. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धोनीनं केलेल्या संथ फलंदाजीनंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. तसंच तिसरा एकदिवसीय सामना संपल्यानंतर धोनीनं अंपायरकडून चेंडू मागून घेतला. २०१४ मध्ये कसोटीतून निवृत्त होण्याआधी त्यानं असाच प्रकार केला होता. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना क्रिकेट वर्तुळात पुन्हा एकदा उधाण आलंय.

गंभीरची धोनीवर टीका

धोनीच्या संथ बॅटिंगमुळे त्याच्यासोबत खेळणाऱ्या बॅट्समनवरचा दबाव वाढत असल्याचं गंभीर म्हणाला. तिसऱ्या वनडेमध्ये धोनीनं ६६ बॉल खेळून ४२ रन केले. यामध्ये ४ फोरचा समावेश होता. धोनी बॅटिंगला आला तेव्हा २५ ओव्हरमध्ये भारताचा स्कोअर १२५ रनवर ३ विकेट होता. त्यावेळी कर्णधार विराट कोहली धोनीसोबत मैदानात होता.

दुसऱ्या वनडेमध्येही धोनीनं संथ खेळी केली. ३२३ रनचा पाठलाग करताना धोनी २७ व्या ओव्हरला बॅटिंगला आला तेव्हा भारताचा स्कोअर १४० रन होता.  त्यावेळी सुरेश रैना धोनीसोबत खेळत होता. या मॅचमध्ये धोनीनं ५९ बॉलमध्ये ३७ रन केले. यामध्ये २ फोरचा समावेश होता.

धोनी आधी असा खेळायचा नाही

याआधी धोनी एवढे डॉट बॉल खेळायचा नाही. यावर धोनीला काम करायची गरज आहे. धोनी सध्या फॉर्ममध्ये नाही. धोनी आधी खेळपट्टीवर वेळ घेतो आणि नंतर फटकेबाजी करायला सुरुवात करतो. पण सध्या असं होत नाहीये. तुम्ही वेळ घेणार असाल तर तुम्हाला शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकलं पाहिजे, असं वक्तव्य गंभीरनं केलं.

धोनीला पाहून गावसकर यांना ती खेळी आठवली

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये धोनीनं ५९ बॉलमध्ये ३७ रनची खेळी केली. धोनीच्या या संथ खेळीवर टीका होत आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेननं धोनीच्या या खेळीवर प्रश्न उपस्थित केले. तर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनीही त्यांचं मत मांडलं आहे. धोनीच्या खेळीमुळे मला माझी १९७५ सालच्या वर्ल्ड कपची खेळी आठवल्याचं गावसकर म्हणाले. १९७५ सालच्या वर्ल्ड कपमधील इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये गावसकर यांनी १७४ बॉलमध्ये ३६ रन केल्या होत्या. या मॅचमध्ये भारताचा २०२ रननी पराभव झाला होता.

कोहलीकडून धोनीची पाठराखण 

लोकं एवढ्या लवकर निष्कर्षापर्यंत पोहोचतात हे दुर्भाग्यपूर्ण आहे. जेव्हा धोनी चांगलं खेळतो तेव्हा तो सर्वोत्तम फिनिशर असतो पण जेव्हा गोष्टी हव्या तश्या होत नाहीत तेव्हा त्याच्यावर टीका होते. धोनीकडे अनुभव आहे पण प्रत्येकवेळी तुम्हाला हव्या तसंच होत नाही. आम्हाला धोनीवर आणि त्याच्या क्षमतेवर पूर्णपणे विश्वास आहे, असं कोहली म्हणालाय.