दुबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आपल्या खेळीने एक वेगळी ओळख क्रिकेट विश्वात तयार केली आहे. यावर्षी 15 ऑगस्टला धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं. पण आयसीसीने त्याचा सन्मान केला आहे. आयसीसीने निवडलेली वनडे आणि दशकातील टी-20 संघात त्याचा समावेश केला आहे. आयसीसीने या संघाच्या कर्णधारपदी धोनीची निवड केली आहे. त्याचबरोबर दशकातील सर्वोत्कृष्ट संघामध्ये विराट कोहलीचा समावेश करण्यात आला आहे.
आयसीसीने निवडलेल्या वनडे संघात सलामीवीर म्हणून रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नर तर तिसर्या क्रमांकावर विराट कोहली आहे. या संघात चौथ्या क्रमांकासाठी एबी डिव्हिलियर्सची निवड झाली आहे तर अष्टपैलू शकीब अल हसनला पाचव्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. धोनीला सहाव्या स्थानावर स्थान देण्यात आले असून ते संघाचा कर्णधार तसेच विकेटकीपर म्हणून आहेत. याशिवाय बेन स्टोक्सचा संघात अष्टपैलू तर मिशेल स्टार्क, ट्रेंट बाउल्ट आणि लसिथ मलिंगा यांना वेगवान गोलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. संघात फिरकीपटू म्हणून इमरान ताहिरची निवड झाली आहे.
रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, साकिब अल हसन, एमएस धोनी (कर्णधार), बेन स्टोक्स, मिचेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट, इम्रान ताहिर, लसिथ मलिंगा.
आयसीसीनेही एमएस धोनीला आपल्या दशकातील सर्वोत्कृष्ट टी-20 संघाचा कर्णधार म्हणून निवडले आहे. या संघात सलामीवीर फलंदाज म्हणून आयसीसीने रोहित शर्मा आणि ख्रिस गेलचा समावेश केला आहे. तिसर्या क्रमांकावर अॅरॉन फिंच तर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी विराट कोहलीला कायम ठेवण्यात आले आहे. पाचवा फलंदाज म्हणून एबी डिव्हिलियर्सचा संघात समावेश आहे तर ग्लेन मॅक्सवेल सहाव्या क्रमांकावर आहे. महेंद्रसिंह धोनी सातव्या क्रमांकावर असून तो कर्णधार आणि विकेटकीपर आहे. किरोन पोलार्ड, त्यानंतर राशिद खान फिरकीपटू म्हणून संघात आहे. वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगाचा संघात समावेश करण्यात आला आहे.
रोहित शर्मा, ख्रिस गेल, आरोन फिंच, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, एमएस धोनी (कर्णधार), किरोन पोलार्ड, राशिद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा.
आयसीसीने विराट कोहलीला दशकातील सर्वोत्कृष्ट कसोटी संघाचा कर्णधार म्हणून निवडले आहे. विराट व्यतिरिक्त जसप्रीत बुमराहही या संघात आहे. संघात सलामीवीर म्हणून अॅलिस्टर कुक आणि डेव्हिड वॉर्नर आहेत तर आयसीसीने केन विल्यमसनला तिसर्या क्रमांकावर फलंदाजीसाठी नियुक्त केले आहे. चौथ्या क्रमांकावर विराट कोहली तर पाचव्या स्थानावर स्टीव्ह स्मिथ आहे. सहाव्या क्रमांकावर कुमार संगकारा असून तो विकेटकीपर देखील आहे. याशिवाय या संघात बेन स्टोक्स, आर अश्विन, डेल स्टेन, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन यांचा समावेश आहे.