हॅमिल्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा ४ धावांनी पराभव झाला. या पराभवाबरोबरच भारतानं ३ टी-२० मॅचची मालिका २-१नं गमावली. आपल्या धुवाधार बॅटिंगने भारताला विजय मिळवून देणाऱ्या धोनीला आज फारसे काही करता आले नाही. पण मैदानात जे काही केलं ते पाहून तुमच्या मनात त्याच्याविषयीचा आदर नक्कीच वाढेल.
सामन्यादरम्यान धोनीचा एक चाहता त्याला जवळून पाहण्यासाठी मैदानात शिरला. त्यावेळी त्याच्या हातात तिरंगा होता. धोनीच्या जवळ आल्यानंतर या चाहत्यानं धोनीचे पाय धरले. तिरंगा जमिनीला स्पर्श करतोय, हे लक्षात येताच धोनीने त्या चाहत्याच्या हातून झेंडा काढून घेतला. धोनीच्या या देशप्रेमामुळे त्याच्या चाहत्यांकडून आणि समाजमाध्यमांवरुन कौतुक होत आहे.
14th time, Fan breached security authorities and touched Dhoni's feet!! And that too in NZ !!@msdhoni #MSD #NZVIND pic.twitter.com/bx3oZMSNDy
— Vidyadhar R (@Vidyadhar_R) February 10, 2019
धोनीने आजच्या सामन्यात टी-२० क्रिकेट प्रकारात ३०० सामने खेळण्याचा विक्रम केला. हा असा विक्रम करणारा धोनी हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. सोबतच धोनीने आतापर्यंत एकूण ५२४ आतंरराष्ट्रीय सामन्यातील ५९४ डावांमध्ये विकेटकिपिंग करण्याचा विक्रम केला आहे. याप्रकारचा विक्रम करणारा धोनी हा क्रिकेट विश्वातील दुसराच खेळाडू ठरला आहे.
धोनीने किपींग करताना अनेकदा आपली हुशारी दाखवून दिली आहे. धोनीने स्टंपच्यामागे केलेल्या प्रत्येक प्रयोगांमध्ये तो यशस्वी होतो. धोनीने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात अशाच प्रकारे न्यूझीलंडच्या टीम सायफर्टला ४३ धावांवर स्टंपिंग करत बाहेरचा रस्ता दाखवला.