Dinesh Karthik : टी-20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup) मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघातील (Team India) वरिष्ठ खेळाडूंवर टीकेची झोड उठवली जात आहे. अनेक खेळाडूंच्या निवृत्तीची मागणी केली जात आहे. अशातच आता फलंदाज आणि यष्टीरक्षक दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) एका इन्स्टाग्राम पोस्टने खळबळ उडवून दिली आहे. बुधवारी दिनेश कार्तिकने एक पोस्ट केलीय ज्यामुळे त्याच्या निवृत्तीबाबतच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करणार असल्याचे संकेत दिनशे कार्तिकने दिले आहेत. आयपीयलच्या गेल्या मोसमात आरबीकडून खेळताना दमदार फलंदाजी करत पुनरागमानचे संकेत दिले होते. त्यानंतर अनेकदा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यांमध्ये दिनेश कार्तिकला वगळण्यात आलंय. आता इन्स्टाग्राम पोस्टमुळे दिनेश नव्या चर्चा सुरु झाल्यात.
"भारतासाठी विश्वचषक खेळणे हा मोठा सन्मान आहे. आम्ही सर्व आमच्या ध्येयापासून मागे राहिलो. पण त्यामुळे माझ्या आयुष्यात अनेक अविस्मरणीय क्षण आले. माझे सहकारी, प्रशिक्षक, मित्र आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचे आभार. #DreamsDoComeTrue #T20WorldCup" असे दिनेश कार्तिकने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.
या पोस्टसोबत कार्तिकने ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा एक मोंटाज शेअर केला आहे. कार्तिकचे सहकारी खेळाडू आणि कुटुंबातील सदस्य या व्हिडिओमध्ये आहेत. टी-20 वर्ल्ड कप 2022 च्या उपांत्य फेरीत भारतीय संघाला इंग्लंडकडून 10 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. कार्तिकसाठीही ही स्पर्धा फारशी चांगली नव्हती. त्याची संघात फिनिशर म्हणून निवड झाली होती. विश्वचषक संघात ऋषभ पंतपेक्षा कार्तिकला महत्त्व देण्यात आले होते. पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात कार्तिकला केवळ एक धाव करता आली. यानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धही केवळ सहा धावा केल्या. त्याचवेळी बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने सात धावांचे योगदान दिले होते.
दरम्यान, दिनेश कार्तिकने सध्या सुरु असलेल्या कर्णधारपदाच्या वादाबाबतही भाष्य केले आहे. सध्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघाच्या कर्णधार पदाची पदाची जबाबदारी हार्दिक पंड्याकडे आहे. कार्तिकच्या मते, पंड्याने न्यूझीलंडविरुद्ध मैदानावर जे काही निर्णय घेतले ते योग्य ठरले. "हार्दिकसाठी ही खूप चांगली मालिका होती. मला वाटतं तो मैदानावर होता तेव्हा त्याने सर्व योग्य निर्णय घेतले. या सामन्यातही न्यूझीलंड 15व्या षटकात फलंदाजी करत असताना भारत पिछाडीवर होता. पण त्यानंतर त्याने गोलंदाजीत योग्य बदल करून योग्य क्षेत्ररक्षण केले, त्यामुळे संघ सामन्यात परतला," असे कार्तिकने म्हटले.