'...तोपर्यंत पाकिस्तानसोबत क्रिकेट शक्य नाही'

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी नजीकच्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट खेळलं जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 

Updated: Sep 26, 2019, 02:20 PM IST
'...तोपर्यंत पाकिस्तानसोबत क्रिकेट शक्य नाही' title=

न्यूयॉर्क : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी नजीकच्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट खेळलं जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पाकिस्तान दहशतवादाचं समर्थन करेल आणि तरीही भारत त्यांच्यासोबत क्रिकेट खेळेल, हे शक्य होणार नाही, असं जयशंकर यांनी सांगितलं आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटची सीरिज २०१२ साली खेळली गेली होती. पण दोन्ही देश आयसीसीच्या स्पर्धा आणि आशिया कपमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, 'दोन्ही देशांची नाती अशी असू शकत नाहीत. एक देश दहशतवादाचं समर्थन करेल, आत्मघाती हल्लेखोर पाठवेल. हिंसा वाढवेल आणि तुम्ही त्यांना म्हणाल चला चहासाठी विश्रांती घेऊ आणि क्रिकेट खेळू.'

जयशंकर यांनी उरी, पठाणकोट आणि पुलवामा हल्ल्यावरही भाष्य केलं. आमच्या देशात लोकशाही आहे. यामध्ये तुम्हाला भावनांचा आदर करावा लागतो. रात्रीच्या अंधारत दहशत पसरवायची आणि सकाळच्या उजेडात व्यापार करायचा, असा संदेश आम्ही देऊ शकत नाही, असं वक्तव्य जयशंकर यांनी केलं.

'जगाच्या अनेक भागांमध्ये दहशतवाद आहे, पण जगात असा दुसरा एकही देश नाही जो दहशतवादाचा शेजारी राष्ट्रासाठी उद्योगासारखा वापर करतो,' अशा शब्दात जयशंकर यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला.