मुंबई : केपटाऊनमधील लक्झरी हॉटेलमध्ये कोरोनाव्हायरस संसर्गाचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे सामना रद्द करण्यात आला. दोन्ही संघ या हॉटेलमध्ये थांबले होते. दोन्ही संघांतील काही सदस्य पॉझिटिव्ह आले होते. हॉटेल कर्मचार्यांपैकी 2 जणांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे आता वनडे सिरीजच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
'दोन्ही संघांच्या खेळाडूंचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी' हा निर्णय घेण्यात आला आहे, असे सांगत दोन्ही मंडळांनी एक निवेदन जारी केले.
या मालिकेचा पहिला सामना शुक्रवारी खेळला जाणार होता, पण सामन्याच्या दिवशी सकाळी दक्षिण आफ्रिकेचा एक खेळाडू पॉझिटिव्ह असल्याचे आढळले, त्यामुळे हा सामना रविवारपर्यंत तहकूब करण्यात आला. यानंतर रविवारी देखील वनडे रद्द करण्यात आली. कारण हॉटेल कर्मचार्यांपैकी 2 जण पॉझिटिव्ह आढळले. यानंतर इंग्लंडच्या संघाने नव्याने चाचण्या केल्या.
इंग्लंड संघाचे दोन सदस्यही पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मात्र वनडे सिरीज रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. ईसीबी आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका या दोघांनी उर्वरित दोन सामने होतील अशी अपेक्षा होती, परंतु कोरोनामुळे अखेर ही वनडे रद्द केली गेली.