close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या प्रशिक्षकाला आयपीएलच्या या टीमची जबाबदारी

इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकवून देणारे प्रशिक्षक ट्रॅव्हर बेलिस हे आता आयपीएलमध्ये दिसणार आहेत.

Updated: Jul 18, 2019, 06:37 PM IST
इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या प्रशिक्षकाला आयपीएलच्या या टीमची जबाबदारी

मुंबई : इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकवून देणारे प्रशिक्षक ट्रॅव्हर बेलिस हे आता आयपीएलमध्ये दिसणार आहेत. सनरायजर्स हैदराबादच्या टीमने ट्रॅव्हर बेलिस यांना मुख्य प्रशिक्षक बनवलं आहे. ट्रॅव्हर बेलिस यांची टॉम मूडी यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी सनरायजर्स हैदराबादच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून बेलिस यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली.

ट्रॅव्हर बेलिस यांनी याआधी कोलकाता नाईट रायडर्सला दोनवेळा आयपीएल जिंकवून दिलं आहे. शाहरुख खानची मालकी असणाऱ्या केकेआरने गौतम गंभीरच्या नेतृत्वात २०१२ आणि २०१४ साली आयपीएल जिंकली होती. याशिवाय बेलिस यांनी सिडनी सिक्सरला ऑस्ट्रेलियातली बिग बॅश लिगही जिंकवून दिली होती.

१४ जुलैला झालेल्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंडने ऐतिहासिक कामगिरी केली. पहिल्यांदाच एखाद्या वर्ल्ड कपची फायनल आणि सुपर ओव्हर टाय झाली. अखेर इंग्लंडने न्यूझीलंडपेक्षा जास्त बाऊंड्रीज मारल्यामुळे त्यांना विजेता घोषित करण्यात आलं.

न्यूझीलंडने इंग्लंडला विजयासाठी २४२ रनचं आव्हान दिलं, पण इंग्लंडचा ५० ओव्हरमध्ये २४१ रनवर ऑल आऊट झाला. यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडला विजयासाठी १६ रनचं आव्हान दिलं. पण सुपर ओव्हरही टाय झाली. इंग्लंडने जास्त बाऊंड्रीज मारल्यामुळे त्यांना वर्ल्ड कपचा किताब देण्यात आला.