मुंबई : विराट कोहलीला उचकवलं तर परिणाम भोगायला तयार राहा, असा इशारा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅप डुप्लेसिसनं ऑस्ट्रेलियाच्या टीमला दिला आहे. प्रत्येक टीममध्ये एक-दोन असे खेळाडू असतात ज्यांना उचकवलं किंवा वादात ओढलं तर त्यांचा खेळ उंचावतो. विराट कोहली असाच खेळाडू आहे. आम्ही या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या सीरिजवेळी शांत राहण्याची रणनिती आखली होती. यानंतरही विराटनं सीरिजमध्ये सर्वाधिक रन केले. पण तरी आम्ही सीरिज जिंकण्यात यशस्वी झालो, असं फॅप म्हणाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये विराटनं ३ टेस्टमध्ये ४७.६६ च्या सरासरीनं २८६ रन केले.
२१ नोव्हेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार आहे. भारत-ऑस्ट्रेलियामध्ये ३ टी-२०, ४ टेस्ट आणि ३ वनडे मॅचची सीरिज खेळवण्यात येणार आहे. या सीरिजवेळी विराटला शांत ठेवा, ऑस्ट्रेलियानं विराटवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला तर तो आणखी चांगली कामगिरी करेल, असा सल्ला फॅपनं ऑस्ट्रेलियाच्या टीमला दिला आहे.
केपटाऊन टेस्टवेळी झालेल्या बॉल टॅम्परिंगच्या वादानंतर ऑस्ट्रेलियान खेळाडूंची वागणूक बदलली आहे, असं फॅपला वाटतंय. बॉलशी छेडछाड केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट या खेळाडूंवर बंदी घालण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनाही राजीनामा द्यावा लागला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मॅच जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू असे वागत असल्याचा निष्कर्ष क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या समितीनं काढला होता.
या वादानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या मैदानातल्या आणि मैदानाबाहेरच्या वागणुकीत बदल झाला आहे. त्यांच्या खेळाडूंची आक्रमकता कमी झाली आहे. हा बदल एक नवी संस्कृती बनेल, असं फॅप डुप्लेसिसला वाटतंय.