मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर आलेला भारतीय कर्णधार रोहित शर्माला सराव सामन्यादरम्यान कोरोनाचा फटका बसला. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध एजबॅस्टन टेस्टसाठी तो अनुपस्थितीत राहिला. मात्र, तो आता बरा असून आजच्या पहिल्या टी-20 साठी तो कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.
टी-20 मालिकेपूर्वी तब्येतीचं अपडेट देताना रोहित म्हणाला की, तो आता बरा आहे, पण पुढे काय होईल हे माहीत नाही. रोहितने टी-20 मालिकेच्या तीन दिवस आधी सरावाला सुरुवात केली होती. यामुळेच रोहित या मालिकेसाठी फिट असल्याची माहिती आहे.
रोहित शर्मा पुढे म्हणाला, 'माझी रिकव्हरी चांगली झाली आहे. ज्या दिवशी मला कोविड झाला त्या दिवसापासून 8-9 दिवस झाले आहेत. आम्ही पाहिलं की, कोविड झालेल्या प्रत्येक खेळाडूने वेगवेगळ्या पद्धतीने रिस्पॉन्ड केलं आहे. पुढे काय होईल हे मला माहीत नाही, पण सध्या मी ठीक आहे.
भारतीय कर्णधार रोहित म्हणाला, 'मी तीन दिवसांपूर्वी सराव सुरू केला, त्यामुळे ही मालिका खेळण्याचा निर्णय घेतला. मला शारीरिकदृष्ट्या बरं वाटतंय. आता कोणतीही लक्षणं दिसतंय. सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. फक्त एका रोमांचक खेळाची वाट पाहतोय.
"शेवटच्या कसोटी सामन्यात विजय न मिळवणं निराशाजनक आहे. कसोटी मालिका भारताने जिंकणं गरजेचं होतं. या पराभवाचा वनडे आणि टी 20 मालिकेवर कसा प्रभाव पडतो, हे येणारा काळच सांगेल. तो एक वेगळा फॉर्मेट होता आणि हा वेगळा फॉर्मेट आहे.", असं कर्णधार रोहित शर्मा याने सांगितलंय.