मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत पहिली भेट कुठे झाली? धोनीनं सांगितला किस्सा

माहीला टीम इंडियाचा कर्णधार करण्यात सचिन तेंडुलकरचं खूप मोठं योगदान होतं.

Updated: May 13, 2021, 09:10 AM IST
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत पहिली भेट कुठे झाली? धोनीनं सांगितला किस्सा

मुंबई:  महेंद्रसिंह धोनी यशस्वी विकेटकीपर, फलंदाज आणि कर्णधार म्हणून ओळखला जातो. माहीला जसा खेळ हवा तसा तो आपल्या नियोजनानुसार फिरवतो असाही काहींचा दावा आहे. माहीकडे तेवढं जबरदस्त नियोजन असतं. मैदानातील प्रत्येक घडामोडीवर माहीचं अगदी बारकाईनं लक्ष असतं त्यामुळे कधी काय घडणार हे त्याला नेमकं ठाऊक असतं. माहीला टीम इंडियाचा कर्णधार करण्यात सचिन तेंडुलकरचं खूप मोठं योगदान होतं. इतकच नाही तर त्याच्यातलं कौशल्य ओळखून त्याला सुरुवातीच्या काळात पुढे आणण्यात सचिननं मदत केली होती. 

एका कार्यक्रमादरम्यान महेंद्रसिंह धोनीनं सचिन तेंडुलकरसोबत पहिली भेट कुठे झाली याबाबतचा एक किस्सा सांगितला होता. 'वर्ष नेमकं मला आठत नाही पण साधारण 2001-02च्या आसपास आमची पहिली भेट दिलीप ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान झाली होती. पुण्यामध्ये सामना सुरू होता. या सामन्यात सचिन तेंडुलकर खेळत होता. त्याने 190 धावा केल्या होत्या. त्याला असं खेळताना पाहाणं माझ्यासाठी खूप भाग्यशाली होतं.' 

'रांचीतून आलेला मी मला कधी सचिनला भेटता येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. दिलीप ट्रॉफीदरम्यान पुण्यात सुरू असलेल्या सामन्यादरम्यान मी पाण्या देण्यासाठी मैदानात गेलो. त्यावेळी सचिनन समोरून विचारलं मलाही पाणी मिळेल का? सचिननं मागितलेलं पाणी आणि मैदानात झालेली ही पहिली भेट होती.'

त्यानंतर 2007च्या टी 20 वर्ल्ड कपसाठी महेंद्रसिंह धोनी टीम इंडियाचा कर्णधार असावा असं सचिननं सुचवलं होतं. सचिनच्या प्रत्येक विश्वासावर अपेक्षेवर माही पुरून उरला. माहीनं चॅम्पिनशिप ट्रॉफी जिंकून आणली. 'मैदानात सुरुवातीच्या काळात सचिन आणि माही एकत्र खेळत होते तेव्हा मला सचिन अनेक गोष्टी विचारायचा त्याचं मत घेण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे माझ्या मनातील भीती हळूहळू कमी होत गेली.'