मुंबई : नुकतंच टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने टेस्ट टीमच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. टी-20 आणि वनडेतील कर्णधारपदानंतर त्याने टेस्टच्या कर्णधारपदाचाही त्याग केला. विराटच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला. मात्र भारताचा माजी वेगवान गोलंदाज अतुल वासन यांनी दक्षिण आफ्रिका मालिकेनंतर कर्णधारपद सोडण्याच्या विराट कोहलीच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं नाही.
विराट कोहलीच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयामुळे मला आश्चर्य वाटलं नाही, असं वासन यांनी सांगितलंय. दक्षिण आफ्रिका मालिकेतील पराभवानंतर कोहलीने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता.
अतुल वासन यांनी सांगितलं की, 'मला याचं आश्चर्य वाटत नाही. ऑस्ट्रेलिया मालिकेत धोनीने कसोटी क्रिकेट सोडल्याने मला नक्कीच आश्चर्य वाटले, पण गेल्या 2 महिन्यांपासून भारतीय क्रिकेटमध्ये जे काही सुरू आहे आणि T20 वर्ल्डकपच्या खराब कामगिरीनंतर विराट कोहलीवर दबाव वाढत होता.
विराट स्वतः रन्स करत नव्हता आणि इतरांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होता. पुढे जाऊन चांगली कामगिरी करून टीमचं नेतृत्व करण्याची त्याची क्षमताही कमी दिसत होती, असंही विधान वासन यांनी केलंय.
कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहलीचा आता प्रत्येक फॉरमॅटमध्ये फक्त फलंदाज म्हणून टीमत समावेश होणार आहे. विराटवर आता कोणतंही दडपण नसून तो पूर्णपणे आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करू शकतो, असं अतुल वासन म्हणाले.
बऱ्याच काळानंतर विराट कोहली बुधवारी दुसऱ्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरला. विराटच्या शतकी खेळीला 2 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. विराटने नोव्हेंबर 2019 मध्ये शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं होतं.