कर्णधारपद सोडणाऱ्या विराटवर गावस्करांचा संताप, कारणंही तसंच

विराटच्या चुकीवर माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी त्याला खडे बोल सुनावले आहेत.

Updated: Jan 20, 2022, 02:20 PM IST
कर्णधारपद सोडणाऱ्या विराटवर गावस्करांचा संताप, कारणंही तसंच title=

मुंबई : टी-20 आणि वनडेनंतर नुकतंच विराट कोहलीने टेस्ट टीमच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. विराट आणि कर्णधारपद यावरून अनेक वादविवाद झाले. तर गेल्या 2 वर्षांपासून विराटला एकंही शतक करता आलेलं नाही. अशातच विराटच्या चुकीवर माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी त्याला खडे बोल सुनावले आहेत.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 7 विकेट्सनी पराभव झाला. या सामन्यात विराटने रागाच्या भरात एक चूक केली होती. यावरून गावस्कर यांनी संताप व्यक्त केला आहे.

केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात रविचंद्रन अश्विन 21व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत होता. त्यानंतर त्याचा एक चेंडू थेट आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरच्या पॅडवर गेला. त्यानंतर, भारतीय खेळाडूंच्या अपीलवर मैदानावरील अंपायरने त्याला आऊट दिला.

डीन एल्गरने या रिव्ह्यू घेतला आणि हॉक आयमध्ये चेंडू स्टंपवरून जात असल्याचं दिसलं. टीम इंडियाच्या खेळाडूंना हा निर्णय आवडला नाही आणि सर्व खेळाडू मैदानावरच संतापले. त्यावेळी सध्याचा कर्णधार विराट कोहली, रविचंद्रन अश्विन आणि केएल राहुल यांनीही या निर्णयावर वादग्रस्त विधानं केली. त्यानंतर स्टंप माईकवर जाऊन विराट कोहलीने ब्रॉडकास्टरवर आपला राग काढला. 

या संपूर्ण वादावर सुनील गावस्कर यांनी संताप व्यक्त केला आहे. गावस्कर म्हणाले, "खेळाडूला मैदानावर अनेकदा राग येतो. कोणताही खेळ असो, मग तो फुटबॉल असो, क्रिकेट असो किंवा इतर कोणताही यामध्ये खेळाडू आपला संयम गमावतो."

गावस्कर पुढे म्हणाले, "मला वाटत नाही की तो काही संकेत देण्याचा प्रयत्न करत होता, पण जर एखादा परदेशी कर्णधार आपल्याकडे आला आणि त्याने असं केलं तर आपल्या भारतीयांना कसं वाटेल. आपण ते सहन करणार नाही."

"जेव्हा तुम्ही तुमच्या देशासाठी खेळता, तेव्हा तुम्ही जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करता. मैदानावर तुम्ही चालताना काही बोललात तर ती वेगळी गोष्ट आहे, पण स्टंप माईकच्या दिशेने जाऊन असं केलं तर वाद निर्माण होऊ शकतो, असंही गावस्कर म्हणालेत.