गौतम गंभीरविरुद्ध न्यायालयाकडून जमानती वॉरंट जारी

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरविरोधात न्यायालयानं जमानती वॉरंट जारी केलं आहे.

Updated: Dec 20, 2018, 06:49 PM IST
गौतम गंभीरविरुद्ध न्यायालयाकडून जमानती वॉरंट जारी title=

नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरविरोधात न्यायालयानं जमानती वॉरंट जारी केलं आहे. घर खरेदी करणाऱ्यांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून गंभीरला वारंवार समन्स पाठवण्यात आले, पण तरीही न्यायालयात हजर न झाल्यामुळे गंभीरविरोधात जमानती वॉरंट जारी करण्यात आलं. २०११ साली गाझियाबादच्या इंदिरापुरम भागात एका प्रोजेक्टमध्ये घर विकत घेण्यासाठी १७ जणांनी १.९८ कोटी रुपये दिले. एवढे पैसे देऊनही हा प्रोजेक्ट सुरु झाला नाही. गौतम गंभीर हा रुद्र बिल्डवेल रिएलिटी प्रायव्हेट लिमीटेड आणि एच आर इंफ्रासिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या या संयुक्त प्रोजेक्टचा संचालक आणि ब्रॅण्ड ऍम्बेसेडर होता.

म्हणून निवृत्ती घेतली, गौतम गंभीरचं स्पष्टीकरण

 

या प्रोजेक्टमध्ये घर विकत घेण्याऱ्यांनी १.९८ कोटी रुपयांची फसवणूक झाल्यामुळे २०१६ साली तक्रार दाखल केली होती. यानंतर आता मुख्य दंडाधिकारी मनिष खुराना यांनी गंभीरविरुद्ध जमानती वॉरंट जारी केला. गौतम गंभीर या प्रकरणात न्यायालयात हजर राहत नाहीये. सुनावणीच्या शेवटच्या तारखेच्या उपस्थितीमध्ये सूट फेटाळण्यात आल्यानंतरही गंभीर आला नाही. त्यामुळे त्याच्याविरुद्ध १० हजार रुपयांचा जमानती वॉरंट काढण्यात येत असल्याचं खुराना यांनी सांगितलं. याप्रकरणाची पुढची सुनावणी २४ जानेवारीला होणार आहे.