नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजप नवीन उमेदवारांना तिकीट द्यायचा प्रयत्न करत आहे. यासाठी देशभरात भाजप लोकप्रिय अभिनेते, अभिनेत्री आणि खेळाडूंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी इच्छूक आहे. यामध्ये भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीर याच्या नावाचीही चर्चा सुरु आहे. या सगळ्यावर आता खुद्द गौतम गंभीरने प्रतिक्रिया दिली आहे. या सगळ्या चर्चांचं गंभीरने खंडन केलं आहे. तसंच निवडणूक लढवण्याबाबत आपण विचार केला नसल्याचं गंभीर म्हणाला.
नुकताच पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला गौतम गंभीर म्हणाला. 'मी माझं संपूर्ण आयुष्य क्रिकेट खेळण्यात घालवलं. पूर्णवेळ राजकारणात आल्यामुळे माणूस बदलून जातो, असं मी ऐकलं आहे. माझ्या दोन लहान मुली आहेत, त्यांच्याबरोबर मला वेळ घालवायचा आहे. मीदेखील या चर्चा ऐकल्या आहेत. पण सध्या मी आयपीएलसाठी स्टार स्पोर्ट्सवर कॉमेंट्री करणार आहे.'
याआधी गौतम गंभीर हा दिल्लीमधून निवडणूक लढवण्याबाबत गंभीर आहे. लोकसभा निवडणुकीसाठीच्या बैठकीतही गंभीरने भाग घ्यायला सुरुवात केली आहे, असं वक्तव्य भाजपच्या एका नेत्याने केलं होतं. याबद्दल विचारलं असता गंभीर म्हणाला, 'याबद्दल मला कोणतेही संकेत देण्यात आले नाहीत. सध्या तरी ही अफवा आहे.' दिल्लीमध्ये १२ मे रोजी मतदान होणार आहे.
दुसरीकडे भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने वैयक्तिक कारण देऊन लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. भाजपने सेहवागला हा प्रस्ताव दिला होता. पश्चिम दिल्ली मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी सेहवागचं नाव पुढे येत होतं. सध्या या जागेवर भाजपचे प्रवेश वर्मा खासदार आहेत. राजकारण किंवा निवडणूक लढवण्यात मला रस नाही, अशी प्रतिक्रिया सेहवागने दिली.
पश्चिम दिल्लीबरोबरच हरियाणाच्या रोहतकमधूनही सेहवागच्या नावाची चर्चा होत होती. पण सेहवागने या सगळ्या बातम्यांचा इन्कार केला. 'काही गोष्टी बदलत नाही, जशा अफवा. २०१४ सालीही असंच झालं होतं आणि आता २०१९ सालच्या अफवांमध्येही काही नवीन नाही. तेव्हाही रस नव्हता आणि आताही नाही,' असं ट्विट सेहवागने केलं होतं.