हैदराबाद : हैदराबाद आणि मुंबईमध्ये टी-20 सामना रंगणार आहे. चेन्नईविरुद्ध पहिल्याच मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर ही मॅच जिंकण्यासाठी रोहित शर्माची मुंबई मैदानात उतरेल. तर केन विलियमसनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हैदराबादचा पहिल्या मॅचमध्ये विजय झाला आहे. या मॅचआधी मुंबईचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्या खेळणार का नाही याबाबत शंका उपस्थित झाली होती. पण हार्दिक पांड्या ही मॅच खेळण्यासाठी फिट वाटत असल्याचं रोहित म्हणालाय.
चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये शेवटच्या बॉलवर दुसरी रन काढण्यासाठी पांड्या धावला. यावेळी त्याच्या टाचेला दुखापत झाली होती. दुखापत झाल्यानंतरही पांड्यानं मैदानात येऊन ४ ओव्हर टाकल्या.
पहिल्याच मॅचमध्ये चेन्नईनं मुंबईवर रोमहर्षक विजय मिळवला. शेवटच्या बॉलवर एक विकेट राखून चेन्नईनं मुंबईला पराभूत केलं. चेन्नईच्या या विजयाचे शिल्पकार ठरले ते ड्वॅन ब्राव्हो आणि केदार जाधव. ब्राव्होनं ३० बॉल्समध्ये ६८ रन्सची खेळी केली तर केदार जाधवनं २२ बॉल्समध्ये २४ रन्स केले.
या मॅचमध्ये केदार जाधवच्या मांडीला दुखापत झाली. यानंतर जाधवला मैदान सोडून जावं लागलं. अखेर ९ विकेट पडल्यानंतर जाधव पुन्हा बॅटिंगला आला. शेवटच्या ओव्हरमध्ये चेन्नईला विजयासाठी ७ रन्सची आवश्यकता होती. पण केदार जाधवला दुखापत झाल्यामुळे तो धावून एकही रन काढू शकत नव्हता. मुस्तफिजूर रहमानच्या शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या तिन्ही बॉलला केदार जाधवला एकही रन काढता आली नाही. पण ओव्हरच्या चौथ्या बॉलला जाधवनं सिक्स आणि पाचव्या बॉलला फोर मारून चेन्नईला जिंकवून दिलं.
बॅटिंगला आलेला असतानाच्या पहिल्याच बॉलला केदार जाधव आऊट होता. मयांक मार्कंडेयच्या बॉलिंगवर केदार जाधवच्या पायाला बॉल लागला. मुंबईच्या टीमनं याबाबत अपीलही केलं, पण अंपायरनं त्याला आऊट दिलं नाही. रिप्ले बघितल्यावर केदार जाधव आऊट असल्याचं लक्षात आलं. यावेळी मुंबई इंडियन्सनं डीआरएस घेतला असता तर मॅचच चित्रच पलटून गेलं असतं. यावेळी चेन्नईचा स्कोअर ६.४ ओव्हरमध्ये ४३/३ असा होता.