Harsha Bhogle Post On Feeding Pigeons: जगप्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले हे क्रिकेटमधील त्यांच्या ज्ञानासाठी ओळखले जातात. समोर सुरु असलेला सामना हर्षा एवढ्या रंजक शब्दांमध्ये वर्णन करतात की टीव्हीवर सामना पाहणाऱ्याला आपण मैदानात उपस्थित आहोत की काय असं वाटू लागतं. सामन्याचं आकलन करुन त्यावर मार्मिक भाष्य करणाऱ्या काही मोजक्या समालोचकांमध्ये हर्षा यांचा समावेश होतो. हर्षा भोगले हे सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय आहेत. जगभरात खेळवल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यांबरोबरच मालिकांबद्दलही ते नियमितपणे आपली मत सोशल नेटवर्किंगवरुन आणि खास करुन एक्स (ट्वीटरवरुन) मांडतात. सध्या ते भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेबद्दल सातत्याने आपली मतं मांडत आहेत. मात्र त्यांनी शनिवारी अचानक एका वेगळ्याच विषयासंदर्भात पोस्ट केली.
झुकर डॉक्टर नावाच्या अकाऊंटवरुन मुंबईमधील एक फोटो शेअर करण्यात आलेला. या फोटोमध्ये इमारतींच्या आजूबाजूला कबुतरं उडताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना त्याला, "कृपा करुन कबुतरांना खायला घालणं बंद करा. तुम्ही तुमच्यासाठी आणि इतरांसाठीही घातक असलेल्या श्वसनासंदर्भातील विकारांना एकप्रकारे पाठिंबा देत आहात," अशी कॅप्शन देण्यात आली आहे.
हाच फोटो रिट्वीट करुन कोट करत हर्षा भोगलेंनी या मागणीला पाठिंबा दिला आहे. कबुतरांना खायला घालणाऱ्यांविरोधात हर्षा यांनी संताप व्यक्त करत त्यांना असं न करण्याची विनंती हर्षा यांनी केली आहे. "नक्कीच. कृपा करुन कबुतरांना खायला घाणं टाळा. ही कबुतरं आरोग्यासाठी घातक असतात," असं हर्षा भोगलेंनी म्हटलं आहे.
Absolutely. Please, please, stop feeding pigeons. They are a menace to health https://t.co/4F1uTNfX3Z
— Harsha Bhogle (@bhogleharsha) February 24, 2024
आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सांगण्याप्रमाणे कावळे, चिमण्या व मैना या पक्ष्यांपेक्षा आरोग्याच्या दृष्टीने कबुतरांचा उपद्रव खूपच जास्त असतो. कबुतरांची पिसं, विष्ठेमुळे मानवाला श्वसनसंस्थेचे, फुप्फुसाचे, छातीचे व अन्य गंभीर स्वरूपाचे आजार होऊ शकतात. कबुतरं खिडकीवरील मोकळी जागा, इमारती, एसी डक्टमध्ये बसतात. घरांच्या आजूबाजूला कबुतरं आपली घरटी बांधतात. तसेच कबुतरं आपली पिसे गाळतात व विष्ठा करतात. त्यामुळे या अशा ठिकाणी तयार होणाऱ्या बुरशीपासून त्या भागातील हवा दूषित होते. कबुतरांची घरटी जवळपास असतील तर तेथे राहणारे लोक दूषित हवा श्वासाद्वारे शरीरात घेतात. वरवर निरुपद्रवी दिसणारा हा पक्षी प्रत्यक्षात मात्र प्राणघातक आजारांचा वाहक आहे. फ्लूप्रमाणेच कबुतरांच्या माध्यमातून संसर्ग होणाऱ्या आजारांची लक्षणं आहेत. यामध्ये प्रामुख्याने सर्दी, ताप, अस्वस्थ वाटणे, सांधेदुखी, धाप लागणे, खोकला व वजन कमी होणे यासारख्या सामस्यांचा समावेश आहे.
कबुतरांपासून आपलं घर सुरक्षित ठेवण्यासाठी पॉलीइथिलीन नेटचा पर्याय वापरता येईल. वेगवेगळ्या प्रकारची व आकारांची पॉलीइथिलीन जाळी सहजपणे बसविता व काढता येतात. अगदी स्वस्तात उपलब्ध असलेला हा पर्याय कबुतरांना घराच्या आजूबाजूला घरटी करण्यापासून रोखण्यासाठी उत्तम मार्ग आहे. तसेच कबुतरांच्या माध्यमातून पसरणाऱ्या गंभीर आजारासंदर्भात जनजागृती करणे आवश्यक आहे. अनेकांना या असल्या संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव कबुतरांमुळे होतो याची कल्पनाच नसते.