मुंबई : भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीच्या बायकोनं त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शमीचे महिलांशी अनैतिक संबंध आहेत. शमी मला मारतो, त्यानं माझ्या हत्येचा प्रयत्न केला आहे. शमीनं मॅच फिक्सिंग केली आहे, असे आरोप हसीन जहांनं केले आहेत. पाकिस्तानमधल्या महिलांशी शमीचे अनैतिक संबंध आहेत, असा आरोप हसीन जहांनं केला. मागच्या २ वर्षांपासून शमी मला त्रास देत असल्याचा दावा हसीन जहांनं केला आहे. शमी मला मानसिक आणि शारिरिक त्रास देत असल्याचं हसीन जहांचं म्हणणं आहे.
मोहम्मद शमीनं या सगळ्या आरोपांचा इन्कार केला आहे. माझ्यावर लागलेले आरोप बिनबुडाचे आहेत. याप्रकरणी मला फसवलं जात आहे, असं मोहम्मद शमी म्हणाला आहे. माझ्या लहान मुलीसाठी मला घर वाचवायचं आहे. हसीनला काही समस्या असेल तर तिनं घरामध्ये यावर तोडगा काढावा, असं शमी म्हणालाय.
हसीन जहांनं शमीवर गंभीर आरोप लावले असले तरी शमीनं मात्र तिच्याविरोधात काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या सगळ्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये हसीन जहांच्या आयुष्यातील गुपितं आता समोर येऊ लागली आहेत.
हे सगळे आरोप होत असतानाच आता हसीन जहांचा पहिला पती समोर आला आहे. हसीनचं पहिलं लग्न २००२ साली झालं होतं आणि २०१०मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला होता.
हसीन जहांला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत. यातली एक मुलगी १०वीमध्ये तर दुसरी मुलगी सहावीत आहे. हसीन आणि मी १०वीमध्ये असतानाच प्रेमात पडलो, असा दावा हसीनचा पहिला पती सैफुद्दीननं केला आहे. हसीन जहां खूप महत्वकांक्षी असल्याचंही सैफुद्दीन म्हणाला आहे.
मोहम्मद शमी आणि हसीन जहां २ वर्ष डेट करत होते. यानंतर २०१४मध्ये दोघांचं लग्न झालं. या दोघांना एक मुलगीही आहे. हसीन जहां लग्नाआधी मॉडेलिंग करत होती. तसंच ती कोलकाता नाईटरायडर टीमची चीयर लीडरही होती.
लग्नानंतर हसीन जहांनं मॉडेलिंग करणं सोडून दिलं. शमीच्या वडिलांना हसीनं मॉडेलिंग करणं आवडत नव्हतं, त्यामुळे तिला हा निर्णय घ्यावा लागला. शमी आणि हसीनमध्ये याआधी वाद झाले नव्हते. त्यांचं नातं पुन्हा सुरुवातीसारखंच होईल, असा विश्वास हसीनचे वडिल मोहम्मद हुसेन यांनी व्यक्त केलाय.
महेंद्रसिंग धोनीची बायको साक्षी माझी जवळची मैत्रिण असल्याचं हसीन जहां सांगायची. पण याबाबत साक्षीकडून कधीच कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.