भुवनेश्वर : ४३ वर्षांचा हॉकी वर्ल्ड कपचा दुष्काळ मिटवण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय टीमची सुरुवात धमाकेदार झाली आहे. १४व्या हॉकी वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेचा ५-०नं पराभव केला. भारताकडून सिमरनजीत सिंगनं २ गोल केले. मंदीप सिंग, आकाशदीप सिंग आणि ललित उपाध्यायनं प्रत्येकी १-१ गोल केला. या विजयाबरोबरच भारतानं ग्रुप सीमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. भारत आणि बेल्जियमचे प्रत्येकी ३-३ पॉईंट्स आहेत. पण भारतीय टीम चांगल्या गोल सरासरीमुळे पहिल्या क्रमांकावर आहे. बेल्जियमनं त्यांच्या पहिल्या मॅचमध्ये कॅनडाला २-१नं हरवलं. बेल्जियम ग्रुप सीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
भारतासाठी पहिला गोल मंदीप सिंगनं केला. भारताचा हा गोल पेनल्टी कॉर्नरवरून आला. भारताचा दुसरा गोल १२व्या मिनिटाला आकाशदीपनं, तिसरा गोल ४३व्या मिनिटाला सिमरनजीत सिंगनं, चौथा गोल ४५व्या मिनिटाला ललित उपाध्यायनं आणि पाचवा गोल पुन्हा सिमरनजीतनं केला.
२०१० वर्ल्ड कपनंतर पहिल्यांदाच भारतानं वर्ल्ड कपची पहिली मॅच जिंकली आहे. याआधी २०१० साली भारतानं पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तानचा ४-१नं पराभव केला होता. तर २०१४ साली बेल्जियमनं भारताचा पराभव केला होता. भारतीय टीम मागच्या वर्ल्ड कपमध्ये नवव्या क्रमांकावर राहिली होती. भारतानं १९७५ साली एकमेव हॉकी वर्ल्ड कप जिंकला होता.
आकाशदीपचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा भारतासाठीचा हा दुसरा गोल होता. तर यंदाच्या वर्ल्ड कपमधला पहिला आणि वर्ल्ड कप इतिहासातला ६वा गोल होता. मागच्या वर्ल्ड कपमध्ये आकाशदीपनं ५ गोल केले होते. २०१४ सालच्या वर्ल्ड कपमध्ये आकाशदीप भारताचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू होता. आकाशदीपपेक्षा फक्त ३ खेळाडूंनाच जास्त गोल करता आले होते.
भारताला २०१४ सालच्या वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हा बेल्जियमनं भारताला ३-२नं हरवलं होतं. यावेळीही भारत आणि बेल्जियम एकाच ग्रुपमध्ये आहेत. भारत आणि बेल्जियममध्ये २ डिसेंबरला मॅच होणार आहे. बेल्जियमनं त्यांच्या पहिल्या मॅचमध्ये कॅनडाला हरवलं आहे. हॉकीमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आणि बेल्जियम तिसऱ्या क्रमांकावर आहे. मागचं रेकॉर्ड आणि क्रमवारी बघितली तर हा मुकाबला भारताला कठीण जाऊ शकतो.