टीम इंडियाच्या फिरकीसमोर 'बॅझबॉल' उद्ध्वस्त, इंग्लंडचा डाव 246 धावांत गडगडला

Ind vs Eng 1st Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये सुरु झाला. भारताच्या फिरकी गोलंदाजीसमोर इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 246 धावात गडगडला.

राजीव कासले | Updated: Jan 25, 2024, 03:39 PM IST
टीम इंडियाच्या फिरकीसमोर 'बॅझबॉल' उद्ध्वस्त, इंग्लंडचा डाव 246 धावांत गडगडला title=

Ind vs Eng 1st Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून सुरु झाला. हैदराबादमध्ये खेळवल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stokes) टॉस जिंकला आणि पहिली फलंदाजी घेतली. पण कर्णधाराचा हा निर्णय संघाला चांगलाच महागात पडला. टीम इंडियाच्या फिरकीसमोर (Team India Spinners) इंग्लंडचा (England) संपूर्ण सँघ अवघ्या 246 धावात गडगडला. आर अश्विन आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. 

इंग्लंडची बॅझबॉल रणनिती चर्चेत
पहल्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंड संघची बॅझबॉल रणनीती चांगलीच चर्चेत होती. पण हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर भारतीय फिरकीसमोर इंग्लंडची बॅझबॉल रणनितीत पूर्णपण उद्ध्वस्त झाली. हैदराबाद कसोटीत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारतीय फिरकीसमोर इंग्लंडचा हा निर्णय चुकीचा ठरला. इंग्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या 246 धावात ऑलआऊट झाला. 

भारतीय फिरकीचा जलवा
रोहित शर्माच्या नेतृत्वात मैदानात उतरलेल्या टीम इंडियात रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या तीन फिरकी गोलंदाजांचा समावेश करण्यात आला होता. या तिघांनी इंग्लंडचे तब्बल 8 विकेट माघारी धाडले. अश्विन आणि जडेजाने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर अक्षर पटेलने दोन विकेट पटकावल्या. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला दोन विकेट घेण्यात यश मिळालं. होमग्राऊंडवर खेळणाऱ्या मोहम्मद सिराजला एकही विकेट घेता आली नाही. 

कर्णधाराने लढवला किल्ला
भारतीय फिरकीसमोर इंग्रज फलंदाज शरणागती पत्करत असताना कर्णधार बेन स्टोक्सने एकाट्याने किल्ला लढवला स्टोक्सने 70 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यात त्याने 3 चौकार आणि 6 षटकार लगावले. याशिवाय जॉनी बेअरस्टोने 37, बेन डकेटने 35, जो रुटने 29 आणि टॉम हार्टलीने 23 धावा केल्या. 

बॅझबॉल क्रिकेट म्हणजे काय
बॅझबॉल क्रिकेट म्हणजे कसोटी क्रिकेटमध्येही वेगाने धावा करणं. याच रणनितीचा वापर करत इंग्लंडने गेल्या काही काळात कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. इंग्लंड संघाचे प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम यांनी ही रणनिती आणली आहे. ब्रँडन मॅक्युलम यांचं टोपण नाव बॅझ असं आहे. या नावावरुनच बॅझबॉल हे नाव पडलं.  

भारतीय प्लेइंग-11: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

इंग्लंडची प्लेइंग-11: जॅक क्रॉउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जॅक लीच.