'त्यांच्या फोननंतर निवृत्तीचा निर्णय रद्द केला'; सचिनचा खुलासा

आत्तापर्यंत क्रिकेट खेळलेला जगातला सर्वोत्तम बॅट्समन म्हणजे सचिन तेंडुलकर.

Updated: Jun 3, 2019, 08:56 PM IST
'त्यांच्या फोननंतर निवृत्तीचा निर्णय रद्द केला'; सचिनचा खुलासा  title=

लंडन : आत्तापर्यंत क्रिकेट खेळलेला जगातला सर्वोत्तम बॅट्समन म्हणजे सचिन तेंडुलकर. क्रिकेटमधली बॅटिंगची सगळी रेकॉर्ड सचिनच्या नावावर आहेत. २४ वर्षांच्या प्रदिर्घ कारकिर्दीनंतर सचिन तेंडुलकरने २०१३ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला. तर २०१२ साली सचिन शेवटची वनडे खेळला.

२०१३ साली सचिनने निवृत्ती घेतली असली तरी २००७ वर्ल्ड कपमधल्या टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर सचिनने निवृत्तीचा विचार जवळपास निश्चित केला होता, पण वेस्ट इंडिजचे दिग्गज सर व्हिव्ह रिचर्ड्स यांच्या एका फोननंतर सचिनने हा निर्णय रद्द केला. पुढे सचिन तेंडुलकरचं भारताला वर्ल्ड कप जिंकवून द्यायचं स्वप्न २०११ साली पूर्ण झालं. व्हिव्ह रिचर्ड्स यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात सचिन तेंडुलकरने ही आठवण सांगितली.

'भारतीय क्रिकेटमध्ये त्यावेळी बदलाची गरज होती. बदल झाले नाहीत, तर क्रिकेट सोडून द्यायचं मी ठरवलं होतं. निवृत्त व्हायचं मी ९० टक्के ठरवून ठेवलं होतं. माझ्या भावानेही मला समजवायचा प्रयत्न केला. फार्म हाऊसवर गेल्यानंतर मला व्हिव्ह रिचर्ड्स यांचा फोन आला आणि तुझ्यामध्ये अजून बरंच क्रिकेट बाकी आहे, असं त्यांनी मला सांगितलं. ४५ मिनिटं आमच्यामध्ये चर्चा झाली. त्यांनी केलेला तो फोन माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता', असं सचिन तेंडुलकर म्हणाला.