Yuvraj Singh Interview : एका लोकप्रिय युट्यूबरला दिलेल्या मुलाखतीत युवराज सिंह (Yuvraj Singh) याने एक धक्कादायक खुलासा केलाय. महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आणि मी जवळचे मित्र नाही, आम्ही फक्त क्रिकेटमुळे एकत्र होतो. तेव्हा आम्ही मित्र होतो, पण आम्ही काही खास मित्र नाही, असं युवराज म्हणाला अन् क्रिडाविश्वात मोठी खळबळ उडाली. धोनी आणि युवराज यांच्यात अनेकदा खटके उडाल्याचं पहायला मिळतं. दोन्ही खेळाडूंनी भारतासाठी अनेक सामने खेळले आहेत. 2007 चा वर्ल्ड कप असो वा 2011 चा वर्ल्ड कप... युवराजने आपल्या दमदार कामगिरीने वर्ल्ड कपचा रथ खेचला अन् धोनी अँड कंपनीला विजयाच्या उंभरठ्यावर पोहोचवलं होतं. मात्र, धोनीने युवराजच्या कॅन्सरनंतरच्या कमबॅकसाठी संधी दिली नाही, असा नेहमी आरोप केला जातो. अशातच आता एका मुलाखतीमध्ये युवराजने खळबळजनक खुलासा केला होता.
मी टीम इंडियाचा कर्णधार होणार होतो मात्र, एमएस धोनीची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली असं युवराज सिंह याने (Yuvraj Singh On MS Dhoni) म्हटलं आहे. त्यावेळी त्याने बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांवर टीका देखील केली आहे. जिओ सिनेमा शोमध्ये भारताचा माजी फलंदाज संजय मांजरेकर यांना मुलाखत देताना युवराजने हा खुलासा केला होता. संजय मांजरेकर यांनी जेव्हा युवराजला कॅप्टन्सीवर प्रश्न विचारले तेव्हा त्याने खुलासा करत सर्वांची बोलती बंद केली होती.
तुला कॅप्टन्सीची महत्त्वाकांक्षा होती का? असा सवाल युवराजला विचारला गेला. तेव्हा, अरे नक्कीच, मी कर्णधार व्हायला हवं होतं. पण मला वाटतं ग्रेग चॅपल प्रकरण घडल्यावर जे घडलं. त्यानंतर सगळं बदललं .कदाचित मी एकमेव असा खेळाडू आहे ज्याने मी माझ्या संघातील सहकाऱ्याला पाठिंबा दिला होता. मला असे वाटते की बर्याच लोकांना.. बीसीसीआयच्या काही अधिकार्यांना ते आवडलं नाही आणि त्यांनी कोणालाही कर्णधार बनवावं पण मला नाही, असा निर्धार केला होता. असं मी ऐकलं होतं, पण काय खरं काय खोटं मला माहिती नाही. अचानक मला उपकर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले. सेहवाग संघात नव्हता, त्यामुळे माही 2007 च्या T20 विश्वचषकासाठी कर्णधार बनला.
वीरू सीनियर असल्यामुळे मी कर्णधार होणार असं मला वाटलं. पण वीरू इंग्लंड दौऱ्यावर नव्हता आणि राहुल द्रविड कर्णधार असताना मी एकदिवसीय संघाचा उपकर्णधार होतो. त्यामुळे मला कॅप्टन करतील, अशी शक्यता होती. साहजिकच हा निर्णय माझ्या विरोधात गेला होता, पण मला त्याबद्दल कोणताही पश्चाताप नाही, असं युवराजने खुलेपणाने सांगितलं होतं.
दरम्यान, 2007 च्या झिम्बाब्वे दौऱ्यात ग्रेग चॅपेल यांनी बीसीसीआयला सौरव गांगुलीबद्दल तक्रार करणारा 3000 शब्दांचा ईमेल लिहिला होता. बीसीसीआयने ग्रेग चॅपेलच्या ईमेलवर कारवाई करत सौरव गांगुलीला कर्णधारपदावरून हटवून द्रविडकडे कर्णधारपद दिलं होतं. 2007 च्या विश्वचषकापूर्वी राहुल द्रविडला हटवून सचिन तेंडुलकरला कर्णधार बनवण्याची ग्रेग चॅपल यांची इच्छा होती. त्यामुळे मोठा वाद पेटला होता. याचवेळी धोनी संघात आला होता. मात्र, दिग्गजांना डावलून धोनीला कॅप्टन करण्यात आलं होतं.