शारजाह : आयसीसीनं क्रिकेटच्या नव्या फॉरमॅटला मंजुरी दिली आहे. टेस्ट, वनडे आणि टी-२० नंतर आता आयसीसीनं टी-१० क्रिकेटला परवानगी दिली आहे. २३ नोव्हेंबरपासून शारजाहमध्ये टी-१० स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे. आठ टीममध्ये ही स्पर्धा होणार आहे. सगळ्या अटी आणि शर्ती मान्य केल्यामुळे या स्पर्धेला परवानगी दिल्याचं आयसीसीनं सांगितलं आहे. टी-१० ही आयसीसीची सदस्य असलेल्या एमिरात क्रिकेट बोर्डाची घरगुती स्पर्धा आहे.
या स्पर्धेला परवानगी दिली असली तरी या स्पर्धेची संरक्षक किंवा स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणतीही मदत करणार नाही, असं आयसीसीनं स्पष्ट केलं आहे. आयसीसीनं टी-१० क्रिकेटला मंजुरी दिल्यामुळे भागीदार, खेळाडू आणि क्रिकेट रसिकांचा उत्साह आणखी वाढेल, असं टी-१० लीगचे चेअरमन शाजी उल मुल्क म्हणाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर या स्पर्धेला यशस्वी बनवण्याचा प्रयत्न आम्ही करु, अशी प्रतिक्रिया मुल्क यांनी दिली.