टेस्ट क्रमवारीत विराट पुन्हा पहिल्या क्रमांकावर

ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला मागे टाकत विराट कोहली पुन्हा एकदा टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

Updated: Dec 5, 2019, 11:11 AM IST
टेस्ट क्रमवारीत विराट पुन्हा पहिल्या क्रमांकावर title=

दुबई : ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला मागे टाकत विराट कोहली पुन्हा एकदा टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. आयसीसीने बुधवारी टेस्ट क्रमवारी जाहीर केली आहे. बॉलरच्या यादीत मोहम्मद शमीचा टॉप-१०मध्ये प्रवेश झाला आहे. कोलकात्यात झालेल्या डे-नाईट टेस्टमध्ये कोहलीने बांगलादेशविरुद्ध १३६ रनची खेळी केली. स्मिथला मात्र पाकिस्तानविरुद्धच्या दोन टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये एकही अर्धशतक करता आलं नाही. ताज्या क्रमवारीत कोहलीकडे ९२८ अंक आहेत, तर स्मिथ कोहलीपेक्षा ५ अंक पिछाडीवर आहे.

स्मिथकडे पाकिस्तानविरुद्धच्या ऍडलेड टेस्टआधी ९३१ अंक होते. या टेस्ट मॅचमध्ये स्मिथला फक्त ३६ रन करता आले. सीरिजच्या पहिल्या मॅचमध्येही स्मिथ ४ रन करून आऊट झाला. यामुळे स्मिथच्या क्रमवारीमध्ये ८ अंकांचं नुकसान झालं. स्मिथच्या या अपयशाचा फायदा विराटला झाला. स्मिथकडे सध्या ९२३ अंक आहेत.

टॉप-१०मध्ये अजिंक्य रहाणे सहाव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. तर मयंक अग्रवाल टॉप-१० मधून बाहेर गेला आहे. पाकिस्तानविरुद्ध नाबाद ३३५ रनची खेळी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने १२ स्थानांची उडी मारली आहे. वॉर्नर हा आता पाचव्या क्रमांकावर आहे. मार्नस लॅबुसचेग्ने हा पहिल्यांदाच टॉप-१०मध्ये आला आहे. लॅबुसचेग्ने हा ८व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

पाकिस्तानचा बाबर आजम दोन क्रमवारी वरती १३व्या क्रमांकावर आणि न्यूझीलंडविरुद्ध द्विशतक करणारा जो रूट पुन्हा टॉप-१०मध्ये आला आहे. जो रूट सातव्या क्रमांकावर आहे.

बॉलरच्या क्रमवारीत मोहम्मद शमीला एका स्थानाचा फायदा झाला आहे. शमी हा ७७१ अंकांसह १०व्या क्रमांकावर आहे. बुमराह पाचव्या आणि अश्विन नवव्या क्रमांकावर कायम आहे. बांगलादेशविरुद्ध १२ विकेट घेऊन मॅन ऑफ द सीरिज जिंकणारा इशांत शर्माही १७व्या क्रमांकावर कायम आहे. उमेश यादव २०व्या आणि रवींद्र जडेजा १६ व्या स्थानावर आहेत.

ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स ९०० अंकांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. पाकिस्तानविरुद्ध ऍडलेडमध्ये ७ विकेट घेणारा ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क ४ स्थान वरती १४व्या क्रमांकावर आला आहे.