नवी दिल्ली: आयपीएलनंतर टी 20 वर्ल्ड कपचे सामने होणार आहेत. यामध्ये टीम इंडियाला पाकिस्तान विरुद्ध सामना खेळायचा आहे. भारत पाकिस्तान हा केवळ सामना नाही म्हणून नाही तर देशप्रेम म्हणून नागरिक त्याकडे पाहातात. भारत विरुद्ध पाकिस्तान पुन्हा एकदा 6 वर्षांनंतर पुन्हा मैदानात एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. हा सामना भारताला जिंकणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच पाकिस्तानसाठी देखील महत्त्वाचं झालं आहे.
पाकिस्तानच्या क्रिकेट टीमने जर टीम इंडियाचा पराभव केला तर त्यांना एक मोठी गिफ्ट मिळणार असल्याचा मोठा खुलासा करण्यात आला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या अध्यक्षांनी हा खुलासा केल्यानंतर अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. जर पाकिस्तानी क्रिकेट टीमने टीम इंडियाला पराभूत केलं तर व्यवसायिक रिकामा चेक पाकिस्तानी बोर्डला देणार आहे.
PCB अध्यक्ष काय म्हणाले?
पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे नवे अध्यक्ष रमीज राजा यांनी एका बैठकी दरम्यान यासंदर्भात माहिती दिली आहे. एका पाकिस्तानी व्यावसायिकाने सांगितले की, जर पाकिस्तान क्रिकेट संघाने भारताला टी -20 वर्ल्ड कपमध्ये पराभूत केलं तर तो व्यवसायिक PCB बोर्डला एक कोरा चेक देईल. यावेळी पाकिस्तान क्रिकेट संघ बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डची आर्थिक स्थिती बिकट
ICC ने फंडिंग थांबवलं तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डची परिस्थिती अत्यंत बिकट होऊ शकते. रमीज राजा यांनीही एका बैठकीदरम्यान सांगितले की, पाकिस्तान संघाला आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. रमीज राजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'जर पाकिस्तान संघ आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला तर भविष्यात कोणताही संघ दौऱ्याचा निर्णय घेण्यापूर्वी विचार करेल.' रमीज राजा यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सध्या आयसीसीच्या 50 टक्के निधीवर चालते.
या सामन्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना गमवल्यानंतर आता टी 20 वर्ल्ड कप सामना जिंकणं टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचं आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वातील हा शेवटचा सामना असणार आहे. त्यानंतर टी 20 फॉरमॅटची टीम इंडियाची कॅप्टनशिप विराट कोहली सोडणार असल्याची घोषणा त्याने केली आहे.