World Cup 2019 : भारतीय संघाला मोठा धक्का; आणखी एक खेळाडू संघाबाहेर

... म्हणून त्याच्यावर आली संघाबाहेर राहण्याची वेळ

Updated: Jul 1, 2019, 02:35 PM IST
World Cup 2019 : भारतीय संघाला मोठा धक्का; आणखी एक खेळाडू संघाबाहेर  title=

बर्मिंघम : यंदाच्या क्रिकेट विश्वचषकात पहिल्य़ाच पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला आमखी एक धक्का बसला आहे. पायाला झालेल्या दुखापतीमुळे भारतीय संघातील खेळाडू विजय शंकर याला विश्वचषकातून काढता पाय घ्यावा लागला आहे. एएनाय या वृत्तवाहिनीने सुत्रांचा हवाला देत याविषयीची माहिती दिली. ज्यानंतर अवघ्या काही क्षणांमध्येच या वृत्तावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. 

डाव्या पायाला दुखापत झाल्यामुळे विजय शंकरला त्यातून सावरण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. परिणामी त्याला संघातून वगळण्यात येत आहे, अशी माहिती देत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून त्याच्याऐवजी मयंक अग्रवालची निवड करण्याती शिफारस आयसीसीकडे करण्यात आली आहे. 

विजय शंकर आता अखेर विश्वचषकाच्या शर्यतीतून बाहेर पडल्याचं जवळपास निश्चित झाल्यामुळे आता बीसीसीआयतर्फे आयसीसीकडे त्याच्याऐवजी बदली खेळाडूची मागणी करण्यात आली. रविवारी पार पडलेल्या इंग्लंड विरुद्धच्याच समान्यात भारतीय कर्णधार विराट कोहली याने विजय शंकरच्या दुखापतीविषयी माहिती दिली. त्याच्याऐवजी संघात ऋषभ पंतला स्थान देण्यात आलं होतं.

काही महिन्यांपूर्वीच मयंकचं कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण 

मयंकने यंदाच्याच वर्षी ऑगस्ट महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेतून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पण, अद्यापही ५० षटकांच्या म्हणजेच एकदिवसीय क्रिकेट सामन्यात मात्र त्याने पदार्पण केलेलं नाही. कर्नाटक कडून क्रिकेट खेळणाऱ्या या खेळाडूने आतापर्यंत एकूण ७५ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ४८. ७१ च्या सरासरीने ३६०५ धावा केल्या आहेत.