World Cup 2023 India vs Pakistan : आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखाली पाकिस्तान क्रिकेट संघाने (Pakistan Cricket Team) दणक्यात सुरुवात केली. पहिल्या सामन्यात नेदरलँड आणि दुसऱ्या सामन्यात श्रीलंका संघाचा पराभव केला. सलग दोन विजयामुळे पाकिस्तान संघ सेमीफायनलमध्ये (WC Semifinal) पोहोचणार असा दावा केला जात होता. पण अचानक चित्र पालटलं, टीम इंडियाने (Team India) पाकिस्तानचा पराभव केला आणि पाक संघाचे ग्रहच फिरले. पाक खेळाडूंचा आत्मविश्वास इतका कमी झाला की सलग तीन सामन्यात पराभव पत्करावा लागला.
भारतानंतर पाकिस्तान संघाला ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्धही लाजीरवाणा पराभव पत्करावा लागाल. पाकिस्तान संघाच्या खात्यात पाचपैकी दोन विजय आणि तीन पराभवांसह चार पॉईंट जमा असून पॉईंटटेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. केवळ पॉईंटच नाही तर नेट रनरेटही अतिशय खराब आहे. पाकिस्तानचा नेट रनरेट -0.400 इतका आहे. त्यामुळे क्रीडा तज्ज्ञांच्या मते विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तान संघाचं जाणं जवळपास अशक्य आहे. पण अद्याप एक शक्यता बाकी आहे, ज्यामुळे भारत आणि पाकिस्तानचा संघ थेट विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भिडू शकतात.
असं आहे समीकरण?
टीम इंडियाने विश्वचषकात सलग पाच विजय मिळवलेत. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंज संघाचा पराभव केला. पॉईंटटेबलमध्ये टीम इंडिया अव्वल स्थानावर असून 10 पॉईट खात्यात आहेत. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला आता चारपैकी केवळ दोन सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. टीम इंडियाचे पुढचे चार सामने इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँडबरोबर आहेत. टीम इंडियाचा सध्याचा फॉर्म बघता सेमीफायनलचं गणित टीम इंडियासाठ फारसं कठिण नाहीए.
दुसरीकडे पाकिस्तान संघाचे देखील आणखी चार सामने बाकी आहेत आणि पॉईंटटेबलमध्ये पाकिस्तान पाचव्या क्रमांकावर आहे. पण पुढचे सर्व सामने जिंकत पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर राहिल्यास आणि राऊंडरॉबिनच्या शेवटपर्यंत टीम इंडिया टॉपवर राहिल्यास हे दोन्ही संघ सेमीफायनलमध्ये आमने सामने येऊ शकतात. आणि असं झाल्यास 15 नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणाऱ्या पहिल्या सेमीफायनलमध्ये क्रिकेट चाहत्यांना भारत-पाकिस्तान सामन्याची मेजवाणी मिळण्याची शक्यता आहे.
आयसीसी विश्वचषका स्पर्धेतील पहिली सेमीफायनल 15 नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे मैदानावर तर दुसरा सेमीफायनलचा सामना 16 नोव्हेंबरला कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळवला जाणार आहे. तर 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर अंतिम सामना खेळवला जाणार आहे.