Ind vs Aus: भारतीय संघाने ४१ वर्षानंतर रचला इतिहास

ऑस्ट्रेलियाचं भारताविरुद्धची मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगले.

Updated: Jan 11, 2021, 04:47 PM IST
Ind vs Aus: भारतीय संघाने ४१ वर्षानंतर रचला इतिहास

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने आपल्या कामगिरीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणार्‍या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या तिसर्‍या सामन्यात दिग्गजांना चकित केले. सिडनी क्रिकेट मैदानावर भारताने दुसर्‍या डावात 334 धावा केल्या आणि अवघ्या 5 विकेट गमावल्या. सामना अनिर्णित राहिला परंतु भारतीय संघाने मैदानातील 131 षटकांचा सामना करून 41 वर्षांच्या जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती केली. यामुळे ऑस्ट्रेलियाचं भारताविरुद्धची मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळलेला तिसरा कसोटी सामना हनुमा विहारी आणि आर अश्विनच्या अविस्मरणीय भागीदारीमुळे लक्षात राहिल. दोघांनी मिळून  43 ओव्हरपेक्षा जास्त बॉल खेळले. भागीदारी करत सामना अनिर्णित केला. 
62 रनची भागीदार करणाऱ्या हनुमाने 130 बॉलमध्ये 20 तर अश्विनने 128 बॉलमध्ये 39 रन केले.

भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी येथे दुसऱ्या डावात 131 ओव्हर खेळले. 1980 च्या आधी दिल्लीत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने ही कामगिरी केली होती.  1979 मध्ये इंग्लंडच्या विरुद्ध 150.5 ओव्हरपर्यंत भारताने फलंदाजी केली होती. 

यानंतर भारतीय संघाने 1949 साली कोलकाता येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसर्‍या डावात 136 ओव्हरपर्यंत फलंदाजी केली. त्याच वेळी 1959 मध्ये मुंबई कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाने दुसर्‍या डावात 132 ओव्हरचा संघर्ष केला होता.

भारती संघाने सिडनी कसोटी सामना अनिर्णीत ठेवला आणि मालिकेतील 1-1अशी बरोबरी साधली. अ‍ॅडिलेड येथे खेळलेला पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. यानंतर मेलबर्न टेस्टमध्ये यजमानांना तब्बल 8 विकेट्सने हरवून भारताने जोरदार पुनरागमन केले आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. मालिकेचा चौथा आणि शेवटचा सामना ब्रिस्बेनमध्ये खेळला जाणार आहे, जो निर्णायक ठरेल.