Monty Panesar on Virat Kohli : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी (India vs England) मालिका 25 जानेवारीपासून सुरू होणार आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात खेळल्या गेलेल्या मागील टेस्ट सामन्यात इंग्लंडने भारताचा पराभव केला होता. अशातच आता रोहितसेना इंग्लंडचा खेळ खल्लास करण्यासाठी मैदानात उतरेल. पहिल्या टेस्ट सामन्यापूर्वी इंग्लंडचा माजी स्पिनर मॅन्टी पनेसर (Monty Panesar) याने इंग्लंड संघाचा कॅप्टन बेन स्टोक्सला (Ben Stokes) सल्ला दिलाय.
कसोटी सामन्यादरम्यान जर तुम्ही विराट कोहलीचा इगो हर्ट केला तर तुम्हाला यश मिळेल, असं मॅन्टी म्हणतो. विराट कोहलीचा स्वभाव सर्वांना माहित आहे. जर तुम्ही विराटला मानसिकदृष्टया फसवलं तर तुम्हाला त्याची विकेट लवकर मिळेल. जसं की तुम्ही त्याला वर्ल्ड कपमधील पराभवावरून डिवचू शकता. त्याला चोकर्स म्हणू शकता. तुम्ही विराटची स्लेजिंग करून त्याला बाद करू शकता, असं मॅन्टी पनेसर म्हणतो.
बेन स्टोक्सने टी-ट्वेंटी वर्ल्ड कप आणि वनडे वर्ल्ड कप दोन्ही जिंकलंय. त्यामुळे विराटवर तुम्ही प्रेशर तयार करू शकता. त्याला मानसिक रित्या त्रास देऊ शकता. मला वाटतं की गोलंदाजांनी विराटच्या इगोसोबत खेळलं पाहिजे. त्याला असं बोला की त्याच्यावर दबाव तयार होईल, असं वक्तव्य मॅन्टी पनेसर याने केलंय.
कसोटी मालिका सुरू होण्याआधीच इंग्लंडच्या खेळाडूंनी भारताला डिवचणं सुरू केलंय. विराट कोहलीला खूप अहंकार आहे. या स्टार खेळाडूला नेहमी कसोटी मालिकेत वर्चस्व गाजवण्याची संधी मिळते. तुम्हाला नेहमी सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध खेळायचं असतं ना? मग तुमच्याकडे संधी आहे. तुम्हाला नेहमी उत्तम फलंदाजाला बाद करण्याची संधी मिळत नाही, असं ओली रॉबिन्सनने म्हटलं आहे. जर मी चांगली कामगिरी केली तर मी संघात माझं स्थान निश्चित करू शकतो, असंही ओली रॉबिन्सनने म्हटलं आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे पूर्ण वेळापत्रक…
पहिली कसोटी : 25-29 जानेवारी, हैदराबाद (राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम)
दुसरी कसोटी : 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम (डॉ. वायएस राजशेखर क्रिकेट स्टेडियम)
तिसरी कसोटी : 15-19 फेब्रुवारी, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)
चौथी कसोटी : 23-27 फेब्रुवारी, रांची ( जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम)
पाचवी कसोटी : 7-11 मार्च, धर्मशाला (हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)
कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा संघ –
बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फॉक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.
पहिल्या 2 सामन्यासाठी टीम इंडिया -
रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.