IND vs England | T20I, वनडेनंतर SKY कसोटीही गाजवणार? सूर्यकुमार यादवला टेस्ट पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता

मुंबईचे शिलेदार इंग्लंड सीरिज गाजवण्याच्या तयारीत, दुखापत झालेल्या खेळाडूंच्या जागी 3 शिलेदारांना मिळणार संधी?

Updated: Jul 24, 2021, 04:10 PM IST
IND vs England | T20I, वनडेनंतर SKY कसोटीही गाजवणार? सूर्यकुमार यादवला टेस्ट पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता

मुंबई: श्रीलंका विरुद्ध वन डे सीरिजमध्ये टीम इंडियाने 2-1 ने विजय मिळवला आहे. पहिले दोन सामने आपल्या नावावर करत टीम इंडियाने विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादवने उत्तम कामगिरी करत मॅन ऑफ द मॅचही मिळवलं मात्र सामना पराभूत झाल्याने थोडी निराशा झाली. मात्र सूर्यकुमारसाठी वन डे सीरिजमधील कामगिरी ही इंग्लंडसाठी मोलाची ठरू शकते. 

इंग्लंड दौऱ्यावर तीन खेळाडू जखमी झाल्याने सीरिजबाहेर जाणार आहेत. त्यापैकी शुभमन गिल मायदेशी परतला तर आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर दोघंही सीरिजमध्ये खेळणार नाही अशीच शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सीनियर टीममध्ये तीन जणांचा बॅकअप असणं गरजेचं आहे. यासंदर्भात बीसीसीआय मॅनेजमेंटसोबत चर्चा करत आहे. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पृथ्वी शॉचं नाव पुढे येत आहे. त्यासोबतच जयंत यादव आणि सूर्यकुमार यादवलाही इंग्लंड दौऱ्यासाठी संधी दिली जाण्याची शक्यता आहे. सूर्यकुमारला जर संधी मिळाली तर त्याच्यासाठी हा महत्त्वाचा क्षण असणार आहे. टी 20 आणि वन डे फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवने पदार्पण याआधी केलं आहे. 

आता आंतरराष्ट्रीय कसोटीसाठी सूर्यकुमार यादवला ही संधी मिळण्याची शक्यता आहे. पृथ्वी शॉला ऑस्ट्रेलिया विरुद्ध डेब्यूची संधी मिळाली मात्र त्यावेळी तो फ्लॉप झाला. क्वारंटाइनचे नियम आणि सर्व गोष्टी सांभाळून पृथ्वी आणि सूर्यकुमार वेळेत पोहोचतील की नाही याचीही अद्याप काही माहिती मिळालेली नाही. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यापासून कदाचित त्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 

इंग्लंडमध्ये टीम इंडियात बॅकअपसाठी कोणाची नावं जाणार याबाबत अद्यापही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादवच्या नावाची चर्चा आहे. अधिकृत घोषणेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.