IND vs SA: केपटाऊनमध्ये फलंदाजांसोबत 'मोये मोये' कसोटी क्रिकेट इतिहासातला सर्वात लहान सामना

IND vs SA 2nd Test: केपटाऊन कसोटीचा निकाल अवघ्या दीड दिवसात लागला. म्हणचे पाच दिवसाचा खेळ अवघ्या 107 षटकात संपला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या कमी चेंडूत एखाद्या सामन्याचा निकाल लागला आहे. 

राजीव कासले | Updated: Jan 4, 2024, 09:53 PM IST
IND vs SA: केपटाऊनमध्ये फलंदाजांसोबत 'मोये मोये' कसोटी क्रिकेट इतिहासातला सर्वात लहान सामना title=

IND vs SA 2nd Test: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध केपटाऊन कसोटी सामन्यात टीम इंडियाने (Team India) सात विकेटने विजय मिळवला. हा सामना केवळ दीड दिवसात संपला. भारताला विजयासाठी 79 धावांचं आव्हान मिळालं होतं. हे आव्हान भारताने 12  षटकात पूर्ण केलं. या विजयाबरोबरच टीम इंडियाने दोन कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला एक डाव आणि 32 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. या पराभवाचा बदला टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीत घेतला. पण हा सामन्यावर संपूर्णपणे गोलंदाजांचं वर्चस्व पाहिला मिळालं. दीड दिवसात दोन्ही संघांचे तब्बल 33 विकेट गेले. 

कसोटी इतिहासातला सर्वात लहान सामना
केपटाऊन कसोटी सामना केवळ 642 चेंडू म्हणजे 107 षटकात संपला. चेंडूचा विचार करता कसोटी इतिहासातील हा सर्वात लहान सामना ठरला आहे. दोन्ही संघाचे दोन्ही डाव अवघ्या 642 चेंडूत आटोपले. याआधी 1932 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा कसोटी सामन्याचा निकाल केवळ  656 लागला होता. (Shortest Completed Match in History)

कमी चेंडूत संपलेले कसोटी सामने
642 चेंडू - दक्षिण आफ्रीका vs भारत, केपटाउन, 2024
656 चेंडू - ऑस्ट्रेलिया vs दक्षिण  अफ्रीका, मेलबर्न, 1932
672 चेंडू - वेस्टइंडीज vs इंग्लंड, ब्रिजटाउन, 1935
788 चेंडू - इंग्लंड vs ऑस्ट्रेलिया, मॅनचेस्टर, 1888
792 चेंडू  - इंग्लंडvs ऑस्ट्रेलिया, लॉर्ड्स, 188

केपटाऊनमध्ये फलंदाजांसोबत मोये मोये

केपटाऊन कसोटीवर (Capetown Test) संपूर्णपणे गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं. यजमान दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. पण संपूर्ण संघ अवघ्या 55 धावांवर ऑलआऊट झाला. मोहम्मद सिराजने 9 षटकात केवळ 15 धावा देत सहा विकेट घेतल्या. कसोटी कारकिर्दीतील सिराजची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. तर जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमारने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेचे केवळ दोन फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले.

भारतीय डावाची परिस्थितीही काही वेगळी नव्हती. भारताचा पहिला डाव केवळ 153 धावांवर आटोपला. टीम इंडियाचे शेवचे सहा विकेट तर केवळ 11 चेंडूत गारद झाले. टीम इंडियातर्फे रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहलीने दुहेरी धावसंख्या केली. तर दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी आणि नांद्रे बर्गरने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. पहिल्या दिवशी तब्बल 23 विकेट गेल्या. 

दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डावही अवघ्या 176 धावात ऑलआऊट झाला. यावेळी जसप्रीत बुमराहने सहा विकेट घेत दक्षिण आफ्रिकेचं कंबरडं मोडलं. टीम इंडियाला विजयासाठी 79 धावांचं आव्हान मिळालं. हे माफक आव्हान गाठताना टीम इंडियाचेही तीन फलंदाज बाद झाले. दुसऱ्या दिवशी दहा विकेट गेले. म्हणजे केपटाऊन कसोटीत केवळ पाच सत्रात 33 फलंदाज बाद झाले. 

दक्षिण आफ्रिकेत भारताचे कसोटी विजय
123 धावा - जोहान्सबर्ग, 2006
87 धावा- डरबन, 2010
63 धावा- जोहान्सबर्ग, 2018
113 धावा- सेंचुरियन, 2021
7 विकेट- केप टाउन, 2024