टीम इंडियाच्या 'या' अष्टपैलू क्रिकेटपटूने घेतली निवृत्ती!

भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे.

Updated: Aug 30, 2021, 01:11 PM IST
टीम इंडियाच्या 'या' अष्टपैलू क्रिकेटपटूने घेतली निवृत्ती!  title=

मुंबई : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीने निवृत्तीची घोषणा केलीये. बिन्नी भारतासाठी सहा कसोटी सामने आणि 14 एकदिवसीय सामने खेळलेत. याशिवाय त्याने तीन टी -20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले.

वडील रॉजर बिन्नी प्रमाणे, स्टुअर्ट देखील लोअर मिडल ऑर्डरमध्ये फास्ट बोलिंगसाठी ओळखला जात होता. याशिवाय तो मीडियम पेस सीम आणि स्विंग गोलंदाजी करू शकतो. अनुकूल परिस्थितीत सीम बॉलिंगसाठी तो खूप फायदेशीर ठरायचा. 

बिन्नीने एक निवेदन जारी केलं आहे. यामध्ये तो म्हणतो, 'मला सांगायचं आहे की, मी आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करणं माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे.'

तो पुढे म्हणाला, "माझ्या क्रिकेट जीवनात अतिशय महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल मी बीसीसीआयचे आभार मानतो. वर्षानुवर्षे त्यांचा विश्वास आणि पाठिंबा अभूतपूर्व आहे. जर कर्नाटक राज्य आणि त्यांचा पाठिंबा नसता तर माझा क्रिकेटचा प्रवास सुरू झाला नसता. राज्याचं कर्णधारपद आणि त्यासाठी ट्रॉफी जिंकणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे."

बिन्नीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 24 विकेट घेतल्या आणि 459 धावा केल्यात. त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वोत्तम कामगिरीचा विक्रम केला आहे. त्याने बांगलादेशविरुद्ध 4 धावा देऊन सहा विकेट्स घेतल्या. 

बिन्नीच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने जवळपास कारकीर्दीत 95 सामने खेळले. त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत त्याने 148 विकेट्स घेतल्या आणि 4796 धावा केल्यात.