अबु धाबी : पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये न्यूझीलंडचा फक्त ४ रननी रोमहर्षक विजय झाला आहे. टेस्ट क्रिकेटमधला न्यूझीलंडचा हा सगळ्यात कमी अंतराचा विजय आहे. तसंच पाकिस्तानचाही हा सर्वात कमी अंतराचा पराभवदेखील आहे. या विजयाबरोबरच न्यूझीलंडनं ३ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये १-०नं आघाडी घेतली आहे. भारतात जन्मलेला एजाज पटेल हा न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
या टेस्ट मॅचमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसननं पहिले टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. पहिल्या इनिंगमध्ये न्यूझीलंडला १५९ रनच करता आल्या. यानंतर बॅटिंगला आलेल्या पाकिस्ताननं २२७ रन केले. यामुळे पाकिस्तानला ७४ रनची आघाडी मिळाली. न्यूझीलंडनं त्यांच्या दुसऱ्या इनिंगमध्ये वॉटलिंगच्या ५९ रन आणि हेनरी निकोल्सच्या ५५ रनच्या मदतीमुळे २४९ रन केले. यामुळे पाकिस्तानला विजयासाठी १७६ रनचं आव्हान मिळालं. पण पाकिस्तानची टीम १७१ रनवर ऑल आऊट झाली आणि त्यांचा ४ रननं पराभव झाला.
३० वर्षांचा एजाज पटेल डावखुरा स्पिनर आहे. एजाजचा जन्म मुंबईमध्ये झाला होता. ५ फूट ६ इंच उंच असलेला एजाज पहिले फास्ट बॉलर होता. पण एका क्लब टीमकडून खेळताना एजाजनं स्पिन बॉलिंग टाकायला सुरुवात केली. त्यावेळी स्पिन बॉलिंग चांगली वाटल्यामुळे एजाजनं पुढे स्पिन बॉलिंगच करायला सुरुवात केली.
एजाज पटेलनं चौथ्या इनिंगमध्ये ५९ रन देऊन ५ विकेट घेतल्या. या कामगिरीमुळे एजाजला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. न्यूझीलंडसाठी चौथ्या इनिंगमध्ये पटेलची ही दुसरी सर्वोत्तम बॉलिंग आहे. न्यूझीलंडसाठी सर्वोत्तम कामगिरीचं रेकॉर्ड ऍलेक्स मोयरच्या नावावर आहे. ऍलेक्स मोयरनं १५५ रन देऊन ६ विकेट घेतल्या होत्या. एजाजनं पहिल्या इनिंगमध्येही २ विकेट घेतल्या होत्या.
एजाज पटेल आपल्या पहिल्याच टेस्टच्या चौथ्या इनिंगमध्ये ५ विकेट घेणारा जगातला तिसरा आणि न्यूझीलंडचा पहिला बॉलर आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेचा लुंगी एनगीडी आणि श्रीलंकेच्या अकिला धनंजय यानं हे रेकॉर्ड केलं होतं.