मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन मॅचच्या वनडे सीरिजची शेवटची आणि तिसरी मॅच मेलबर्नला होणार आहे. शुक्रवार १८ जानेवारीला भारतीय वेळेनुसार ही मॅच सकाळी ७.५० वाजता सुरु होईल. या सीरिजच्या पहिल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा तर दुसऱ्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला होता. त्यामुळे ही सीरिज सध्या १-१नं बरोबरीत आहे. तिसऱ्या मॅचमध्ये विजय झाला तर भारत वनडे सीरिज खिशात टाकेल. याचबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये द्विदेशीय सीरिजही भारत पहिल्यांदाच जिंकेल.
मेलबर्नच्या मैदानावर आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये १४ वनडे मॅच झाल्या आहेत. यातल्या ९ मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाला आहे. तर मेलबर्नच्या मैदानात भारतानं आत्तापर्यंत २१ वनडे मॅच खेळल्या, यातल्या १० मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे. मेलबर्नमध्ये भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा या दोघांनीही याआधी शतक केलं आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानात भारताला एकदाही द्विदेशीय सीरिज जिंकता आलेली नाही. २०१५-१६ साली झालेल्या भारत-ऑस्ट्रेलियातल्या सीरिजमध्ये भारताचा ४-१नं पराभव झाला होता. याआधी भारतानं ऑस्ट्रेलियात २००८ साली झालेल्या सीबी सीरिजमध्ये विजय मिळवला होता. पण ती सीरिज भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेमध्ये खेळवण्यात आली होती. तर १९८५ साली ऑस्ट्रेलियात झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्येही भारताचा विजय झाला होता.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्येही भारतानं अशीच कामगिरी केली होती. ४ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारताचा २-१नं विजय झाला होता. ऑस्ट्रेलियामध्ये भारतानं पहिल्यांदाच टेस्ट सीरिज जिंकण्याचा विक्रम केला आहे. आता वनडे सीरिजमध्येही असाच इतिहास घडवण्याची संधी भारतीय टीमला आहे.
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला ३ टी-२० मॅचच्या सीरिजपासून सुरुवात झाली. ही टी-२० सीरिज १-१नं बरोबरीत सुटली, कारण १ मॅच पावसामुळे रद्द झाली होती.
१ भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आत्तापर्यंत १३० वनडे मॅच झाल्या आहेत. यातल्या ४६ मॅच भारतानं आणि ७४ मॅच ऑस्ट्रेलियानं जिंकल्या. १० मॅचचा निकाल लागला नाही.
२ भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये मागच्या ३ वर्षांमध्ये ८ वनडे मॅच झाल्या. यातल्या ६ मॅचमध्ये भारताचा आणि २ मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाला.
३ ऑस्ट्रेलियानं मेलबर्नमध्ये १२३ वनडे खेळल्या आहेत. यातल्या ७४ मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया जिंकली तर ४५ मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. १ मॅच टाय झाली आणि ३ मॅच रद्द झाल्या.
४ सध्याच्या खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाच्या एरॉन फिंचनं मेलबर्नमध्ये ३ वनडे शतकं केली आहेत. तर रोहित शर्मानं या मैदानात २ शतकं केली आहेत. मेलबर्नमध्ये वनडेत सर्वाधिक शतक करण्याचा विक्रम रिकी पॉण्टिंगच्या नावावर आहे. त्यानं या मैदानात ७ शतकं केली होती. भारताच्या विराट कोहली, शिखर धवन आणि सौरव गांगुलीचीही मेलबर्नमध्ये शतकं आहेत.
५ मेलबर्नच्या मैदानात इंग्लंडच्या जेसन रे यानं सर्वाधिक १८० रन केले होते. भारताकडून रोहित शर्मानं या मैदानात सर्वाधिक १३८ रनची खेळी केली होती.
६ ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्ननं या मैदानात सर्वाधिक ४६ विकेट घेतल्या आहेत. भारताकडून कपिल देव यांनी सर्वाधिक १७ विकेट घेतल्या होत्या.
७ मेलबर्नमध्ये वनडेतला सर्वाधिक स्कोअर आयसीसी वर्ल्ड XI च्या नावावर आहे. २००५ साली त्यांनी आशिया XI विरुद्ध ३४४/८ असा स्कोअर केला होता. ऑस्ट्रेलियाचा या मैदानातला सर्वाधिक स्कोअर ३४२/९ आहे. तर भारतानं २०१५ सालच्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मेलबर्नमध्ये सर्वाधिक ३०७/७ एवढा स्कोअर केला होता.