कोलकाता : २०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये भारताची पहिली मॅच ठरली आहे. ५ जूनला भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्ल्ड कपची पहिली मॅच होईल. २०१९चा वर्ल्ड कप ३० मे ते १४ जुलैपर्यंत खेळवण्यात येणार आहे. आणि आयपीएल २९ मार्च ते १९ मे या कालावधीत असेल. याआधी २ जूनला ही मॅच होणार होती. पण आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये १५ दिवसांचं अंतर असणं बंधनकारक आहे, असा नियम लोढा समितीनं बनवला आहे. त्यामुळे भारत- दक्षिण आफ्रिकेचा सामना २ दिवसांनी पुढे ढकलण्यात आला. कोलकात्यामध्ये झालेल्या आयसीसीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
याआधीच्या दोन आयसीसी स्पर्धांना भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यांनी सुरुवात झाली होती. २०१५च्या वर्ल्ड कपवेळी ऑस्ट्रेलियाच्या ऍडलेडमध्ये आणि २०१७ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीवेळी इंग्लंडच्या बर्मिंगहॅममध्ये भारत-पाकिस्तानचे सामने झाले होते. यंदा मात्र भारत-पाकिस्तानमध्ये पहिला सामना होणार नाही. १९९२ साली झालेल्या वर्ल्ड कपप्रमाणे २०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये सगळ्या टीम एकमेकांविरोधात खेळणार आहेत.
या बैठकीमध्ये २०१९ ते २०२३ सालापर्यंतचं क्रिकेट वेळापत्रक निश्चित करण्यात आलं आहे. या कालावधीमध्ये भारत ३०९ आंतरराष्ट्रीय मॅच खेळणार आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार भारत या कालावधीमध्ये ९२ दिवस कमी क्रिकेट खेळणार आहे. असं असलं तरी घरच्या मैदानात भारत १९ टेस्ट मॅच खेळणार आहे. याआधीच्या वेळापत्रकात भारत १५ टेस्ट खेळला होता. या मॅच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या भाग आहेत. या कालावधीत भारत एकही डे अॅण्ड नाईट टेस्ट खेळणार नाही. डे अॅण्ड नाईट टेस्ट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या मॅच दिवसा आणि लाल बॉलनी खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे गुलाबी बॉलनं डे अॅण्ड नाईट टेस्ट खेळवण्यात काहीच अर्थ नसल्याचं बीसीसीआयनं सांगितलं आहे.