‘या’ सीरिजदरम्यान विराट कोहली होता नैराश्येत, विराटकडून खुलासा

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं त्याच्या नैराश्येबाबत मोठा खुलासा केला आहे.

Updated: Feb 19, 2021, 07:58 PM IST
‘या’ सीरिजदरम्यान विराट कोहली होता नैराश्येत, विराटकडून खुलासा

मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना पुढच्या आढवड्यात सुरू होणार आहे. याशिवाय नुकताच आय़पीएलसाठी खेळाडूंचा लिलाव पूर्ण झाला आहे. तिसऱ्या सामन्यासाठी विराटसेना सज्ज आहे. याआधी इंग्लंड विरुद्ध भारत 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये भारतानं 1-1 अशी बरोबरी केली आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं त्याच्या नैराश्येबाबत मोठा खुलासा केला आहे. कोहली देखील काही काळ नैराश्येमध्ये होता. त्यानं याबाबत खुलासा केला आहे. 2014 रोजी इंग्लंड दौर्‍यादरम्यान त्याला नैराश्य आलं होतं. फलंदाजीमध्ये सतत्यानं अपयश आल्यामुळे मी खचून गेलो होतो. मला असं वाटत होतं की मी जगतला एकमेव व्यक्ती आहे.

इंग्लंडचा माजी खेळाडू मार्क निकोल्सोबत संवाद साधताना विराटनं याबाबत खुलासा केला. इंग्लडचा दौरा आपल्या करियरमधील सर्वात जास्त कठीण काळ होता असंही तो यावेळी सांगायला विसरला नाही.

कोहलीला जेव्हा विचारले गेले की तो कधी नैराश्यात असतो तर तो म्हणाला, 'हो, हे माझ्या बाबतीत घडलं आहे. फलंदाजीत धावा करण्यासाठी सक्षम नाही असा विचार मनात येऊ लागला. त्याचा परिणाम माझ्यावर झाला. मला वाटतं प्रत्येक फलंदाजाला असं वाटू शकतं जेव्हा आपण त्यावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरत असू.

2014 मध्ये इंग्लंड दौऱ्यादरम्यानचा काळ हा विराटसाठी सर्वात वाईट होता. कोहलीने पाच कसोटी सामन्यांच्या 10 डावांमध्ये 13.50 च्या सरासरीने धावा केल्या. कोहलीची धावसंख्या 1, 8, 25, 0, 39, 28, 0,7, 6 आणि 20 धावा केल्या होत्या. यानंतर ऑस्ट्रेलिया दौर्‍यामध्ये त्याने 692 धावा करुन शानदार पुनरागमन केलं.

मानसिक तणावाला दुर्लक्ष करून चालत नाही

त्यावेळी जरी मी एकटा असल्याचं वाटत असलं तरी माझ्यासोबत अनेक लोक माझ्या आयुष्यात होते. फक्त मला वाटणारी भावना एकटेपणाची होती. त्यावर नियंत्रण मिळवणं गरजेचं होतं. त्यावर जर योग्य पद्धतीनं काम केलं नाही तर खेळाडूचं आयुष्य उद्धवस्त होण्यासाठी विलंब लागत नाही. त्यामुळे मानसिक स्वास्थ चांगलं राहणं खूप महत्त्वाचं आहे.

भारत विरुद्ध इंग्लड 4 कसोटी सामन्यांच्या सध्या सुरू असलेल्या मालिकेतही विराट कोहलीला आधीच्या दोन्ही सामन्यात धावा काढण्यात विशेष यश हाती लागलं नाही मात्र दुसऱ्या सामन्यात भारतीय संघानं दिमाखदार कामगिरी करत इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला. उर्वरित 2 सामने जिंकण्यासाठी भारतीय संघानं कंबर कसली आहे. तिसरा सामना अहमदाबाद इथे मोटेरा स्टेडियमवर 24 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.