World Cup 2023: वर्ल्डकपचं (World Cup) वेळापत्रक जाहीर झालं असून पारंपारिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष आहे. वेळापत्रकानुसार 15 ऑक्टोबरला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये दोन्ही संघ आपापसात भिडणार आहेत. दरम्यान नियोजित भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामना पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. नवरात्रीमुळे भारत-पाकिस्तान सामन्याच्या नियोजित वेळेत बदल होऊ शकतो.
आयसीसीने नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भारत-पाकिस्तान सामना आयोजित केला आहे. दरम्यान, गुजरातमध्ये नवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अनेक ठिकाणी रात्रभर गरबा कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. त्यामुळे सुरक्षेचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने सुरक्षा यंत्रणांनी बीसीसीआयला वेळपत्रकात बदल करण्याचा सल्ला दिला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या सल्ल्यानंतर बीसीसीआय यावर चर्चा करत असून लवकरच निर्णय घेऊ शकतं. पण हा बदल करणं फार सहज नसणार आहे. कारण या सामन्यात अनेक गोष्टी गुंतल्या असून, प्रत्येक गोष्टीकडे बारीक नजरेने पाहावं लागणार आहे. पण गरज असेल तर सुरक्षेचा विचार करता तारखेत बदल केला जाणार आहे.
पण जर सामन्याच्या तारखेत बदल झाला नाही, तर प्रवासाची योजना आखलेल्या क्रिकेट चाहत्यांची गैरसोय होऊ शकते. या सामन्याची तिकिटं काही तासातच बूक झाली आहेत. त्यामुळे स्टेडिअम गर्दीने खचाखच भरलेलं असणार हे नक्की आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, "लवकरात लवकर निर्णय घ्यायचा असल्याने आम्ही सर्व पर्याय तपासत आहोत. आम्हाला सुरक्षा यंत्रणांकडून सांगण्यात आलं आहे की भारत-पाकिस्तान हाय-प्रोफाइल सामन्यासाठी हजारो प्रवासी चाहते अहमदाबादला पोहोचतील अशी अपेक्षा आहे. नवरात्रीमुळे अडचणी वाढू शकतात त्यामुळे ते टाळणं महत्त्वाचं आहे".
गेल्या महिन्याच्या अखेरीस, ICC ने विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले, यावेळी 1 लाख प्रेक्षक क्षमतेच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चार सामने होणार असल्याचं स्पष्ट झालं. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात होणारा वर्ल्डकपमधील पहिला सामना, भारत विरुद्ध पाकिस्तान, इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि अंतिम सामना येथे नियोजित आहे. ही स्पर्धा 10 शहरांमध्ये होणार असून उपांत्य फेरीचे सामने मुंबई आणि कोलकाता येथे होणार आहेत.
रिपोर्टनुसार, अहमदाबादमधील अनेक हॉटेल्स ऑक्टोबर मध्यापर्यंत ओव्हरबूक झाले आहेत. तसंच घरांमध्ये राहण्याची सुविधाही आता उपलब्ध नाही. याशिवाय विमानाच्या तिकिटांचे दरही वाढण्याची शक्यता आहे. भारत-पाकिस्तान सामन्यासाठी नवीन तारीख जाहीर झाल्यास अनेकांना तिकीट रद्द करावं लागेल ज्यामुळे गोंधळ होऊ शकतो.
दरम्यान, मंगळवारी रात्री बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी 27 जुलै रोजी नवी दिल्ली येथे बैठकीचं आयोजन केलं आहे. विश्वचषक सामन्यांचे आयोजन करणाऱ्या संघटनांना या बैठकीस बोलावण्यात आलं आहे. बैठकीत अहमदाबादमधील सुरक्षेबाबत असणारी चिंता आणि सामन्याच्या नव्या तारखेवर चर्चा होऊ शकते.